मस्करीची कुस्करी झाली, भंकस केल्याने मित्राचा खून केला

murder

5 जुलै पासून बेपत्ता झालेल्या आदित्य सोनी याचा मृतदेह सापडला आहे. उद्योजक असलेल्या आदित्यच्या बेपत्ता होण्याने त्याचे कुटुंबीय धास्तावले होते. त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती आणि आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना आदित्यचा मृतदेह गंगा नदीच्या कालव्यामध्ये सापडला आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूच्या कारणाचा शोध लावला असून त्याला ठार मारण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. आदित्यच्या खुनाप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

ग्रेटर नोएडा इथल्या ओमनिक्रॉन-1 भागात राहणारा उद्योजक आदित्य सोनी हा 5 जुलैला घरातून बाहेर पडला होता, तो परत आलाच नाही. कोरोनाग्रस्त असलेला एक नातेवाईक बरा झाल्याने आदित्य त्याला भेटायला गेला होता. 13 तारखेपर्यंत आदित्यचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या आईने ‘कसना’ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवत असताना तिने आदित्यला त्याचे दोन मित्र देव आणि पंकज यांच्यासोबत बघितल्याचं सांगितलं होतं.

आदित्यचा शोध घ्यायला सुरुवात करणाऱ्या पोलिसांनी पहिले देव आणि पंकजलाच शोधून काढलं. हे दोघे जण सख्खे भाऊ असून त्यांच्याकडूनच आदित्यबाबत ठोस माहिती मिळेल याची पोलिसांना खात्री होती. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आणि चौकशीला सुरुवात केल्यानंतर दोघांचा संयम तुटला आणि दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांकडून आदित्यच्या अंगावर असलेला किंमती ऐवज तसेच आदित्यकडे असलेली रोख रक्कम आणि आदित्यची गाडी सापडली आहे. त्यांनी आदित्यचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला असता काही अंतरावर आदित्यचा मृतदेह सापडला आहे.

चौकशीदरम्यान पंकज भाटीने पोलिसांना सांगितले की आदित्यने एक घाणेरडा जोक मारला होता. यामुळे संतापलेल्या पंकजने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी आदित्यने त्याच्यासोबत गैरवर्तन केलं. यामुळे देव भाटी यानेही भावाची बाजू घेत वादात उडी मारली. या दोघांनी पहिले काठीने आदित्यला बेदम मारहाण केली आणि नंतर गळा आवळून त्याचा खून केला. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या