प्लॅस्टिकच्या राक्षसाचा नायनाट करा! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

16

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईसह राज्यभरात पावसाळ्यात जी पूरस्थिती निर्माण होते याचे कारण नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेले प्लॅस्टिक आहे. समुद्राच्या प्रदूषणातही प्लॅस्टिकचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. या प्लॅस्टिकवर बंदी आणण्याचा महत्त्वाचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घेतला आहे. तेव्हा राज्यातील नागरिकांनीही प्लॅस्टिकच्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.

प्लॅस्टिकबंदीची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दोन्ही सभागृहांत केली. यानंतर रामदास कदम व आदित्य ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईसह राज्यात मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिकची समस्या भेडसावत आहे. मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येबरोबरच ग्रामीण भागात गाय, बैल आदी पशूंचे आरोग्यही प्लॅस्टिकच्या सेवनाने धोक्यात येत आहे. अशा परिस्थतीत प्लॅस्टिकवर बंदी येणे आवश्यक आहे. देशातील १७ राज्यांत प्लॅस्टिकची बंदी झाली असून महाराष्ट्र हे प्लॅस्टिकबंदी करणारे १८ वे राज्य ठरणार आहे.

प्लॅस्टिकबंदीचा दर तीन महिन्यांनी आढावा
सध्या ज्या प्लॅस्टिकला पर्याय आहे अशा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. दुधाच्या पिशव्या त्याचप्रमाणे पाण्याच्या बाटल्यांना अद्याप योग्य पर्याय उपलब्ध न झाल्याने त्यावर सध्या बंदी घालण्यात आलेली नाही. यासाठी पर्याय उपलब्ध करण्याचे निर्देश उत्पादक कंपन्यांना देण्यात आले आहेत. या प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांचेही पर्यावरणाप्रति दायित्व असून योग्य पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी प्लॅस्टिकबंदीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी दर तीन महिन्यांनी प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनची बैठक घेतली जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या