शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्यात मिंधे सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला केला. अन्नदात्याला अतिरेकी म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राची अस्मिता, ओळख जपायची असेल तर गद्दारांना गाडावेच लागेल. आपल्या वज्रमुठीने आपण हुकूमशाही सरकारला घालवू शकतो; असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राची धुरा मिंधेंच्या, भाजपच्या हातात राहिली तर हे आपलं महाराष्ट्र म्हणून नाव पुसून टाकतील. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुणाच्या महाराष्ट्रात रहायचं आहे. बदल घडवायलाचं लागेल. निवडणूक लागेल तेव्हा लागेल. आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे की हे भाजपवाले अफवा पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला आपलं राज्य जपायचं असेल, जोपासायचा असेल, आपला स्वाभिमान जोपासायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. आपण वज्रमूठ म्हणून एकत्र आलो तर सरकारला हलवू शकतो. महाराष्ट्रातील राजवटीला घालवू शकतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
निष्ठा यात्रेत किंवा लोकसभेच्या वेळी आपली लढाई तशी सोपी नव्हती. लढाई करताना दोन्ही बाजू जर एकाच वजनाच्या असतील तर ती लढाई आपण एक फेअर ग्राऊंड मानतो. पण एका बाजूला भाजप होती. सगळंच त्यांच्याकडे होतं ईडी, आयटी, पोलीस, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग आणि एका बाजूला आपण सगळे इंडिया आघाडी होतो. आपली लढाई देशातील लोकशाही, संविधानासाठी होती. ज्या लोकांना वाटत होतं ते 400 पार जातील, ज्या लोकांना वाटत होतं की त्यांची हुकूमशाही आपल्यावर लादू शकतील, ज्या लोकांना वाटत होतं संविधान बदलू शकतील, ज्या लोकांना वाटत होतं संविधान बाजूला ठेवून लोकशाहीला चिरडू शकतील. त्या भाजपाला रोखलं, हुकूमशाहाला रोखलं म्हणून मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे.
सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे ही येणारी विधानसभेची निवडणूक आहे. आपण ठरवलं पाहिजे विधानसभेत आपलाच विजय झाला पाहिजे. अनेकदा आपण विचार करतो मला गावात रस्ता करायचा, मला गावात पिण्याचं पाणी आणायचंय म्हणून अमुकाला आमदार करेन. पण ही निवडणूक नुसतं वॉटर, कटर, मीटरवर नाही आहे. ही निवडणूक गावातील रस्त्यांबद्दल नाही, ही निवडणूक कोण आपल्याला काय सांगून जातंय याबद्दल नाही. ही निवडणूक आपल्या गेल्या पाच वर्षातील अनुभवाबद्दल आहे. 2019 पासून 2024 पर्यंत आपण पाहत आलो. दोन वर्ष आपली महाविकास आघाडीची आणि दोन वर्ष मिंधे सरकारची, खोके सरकारची. कोविड काळात उद्धव साहेबांचं नेतृत्व होतं. त्यावेळी त्याचं कौतुक फक्त देशात नाही जागतिक आरोग्य संस्थेनेही केलं होतं की महाराष्ट्र मॉडेल हे जगाने पाहिलं पाहिजे. पण आज आपण पाहतो काही आतापता नाही. सगळं लक्ष कॉन्ट्रॅक्टवर, टेंडरवर आहे, जनतेवर लक्ष नाही.
गेली दोन वर्षात परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आठवड्याला एक आत्महत्या होते. पण सरकारमधून कुणी सांगायला येतंय का आम्ही तुमच्यासोबत आहोत. या राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत माहित आहे का? नाव माहित आहे का? पाहिलंत का कधी? आपल्या जिल्ह्यात आले का? बांधावर आले का? कधीच नाही आले. आता निवडणूक आली की येतील. घराघरात फिरतील. आपला लाडका शेतकरी योजना अशी काढतील. याची तुलना आपल्या सरकारशी करा. आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री बनले होते, लगेच त्यांनी कर्जमुक्ती जाहीर केली. दोन लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज होती, त्या शेतकऱ्यांची कर्ज मुक्त करुन दाखवली हे आपलं सरकार होतं. कोविड काळात जेव्हा जेव्हा अर्थसंकट आलं तेव्हा जी काही मदत करु शकलो ती केली.
अजून निवडणूक कधी लागेल कुणाला माहित नाही. निवडणूक आयोगाला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लावायला परवानगी मिळाली नाही. दिल्लीच्या बॉर्डरवर जे शेतकरी आंदोलनाला बसले होते त्यांना भाजप अतिरेकी बोलून झालंय, नक्षलवादी बोलून झालंय, माओवादी बोलून झालंय, त्यांच्यावर लाठीचार्ज करुन झालंय, अश्रूधूर सोडून झालंय, गोळीबार करुन झालंय. पण अजून भाजपच्या मनातील शेतकऱ्यांबद्दलचा राग अजून जात नाही आहे. कालच कंगना रनौत बोलल्या की शेतकरी जिथे आंदोलनाला बसले होते तिथे बलात्कार, हत्या चालू होते. आपल्याला कंगना रनौतचं हे वाक्य मान्य आहे का? तुम्हाला जे भाजप अतिरेकी बोलतं, माओवादी बोलतं, शेतकरी आंदोलनामध्ये बलात्कार चालू होतं म्हणतं, हे तुम्हाला सगळं मान्य आहे का? जे अन्नदात्याला अतिरेकी म्हणातात, त्याला शेतकरी म्हणून आपण कधीच माफ करु शकणार नाही.
आपल्या राज्यासोबत नेहमी दुजाभाव चालू असतो. पण लोकसभेत त्यांना कळलं तुम्ही आमच्यासोबत दुजाभाव कराल तर तुम्हाला इथून पळवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे. महाराष्ट्रात पावणे दोनशे आमदारा सत्ताधारी पक्षात आहेत. पावणे दोनशे आमदारांपैकी एकानेही सांगितले नाही मी माझ्या मतदारसंघात तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी आणली. सत्ताधारी आमदारांची प्रगती झाली, मात्र आपल्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध केली का? आपलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गुंतवणूक आणली आपण, नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. आता आपलं सरकार असतं तर तीन लाख तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. आज सगळीकडे भ्रष्टाचार आहे. कारण गद्दारांचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आहे. महाराष्ट्राला दिले धोके, स्वतःसाठी 50 खोके. महाराष्ट्राचा स्वाभिमान, आत्मा चिरडला जातंय हे आपण पाहतोय. महाराष्ट्राला पहिल्या 10 राज्यातून बाहेर काढायचं आहे.
कोकणात मालवणमध्ये पंतप्रधानांनी 4 डिसेंबर रोजी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. पंतप्रधानांना जेव्हा तुम्ही अनावरण करण्यासाठी तेव्हा एवढीही काळजी घेत नाही यात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. याची चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. काल परवा एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला. हल्ला होतोच कसा हिंमत होतेच कशी. फसव्या योजना आणून मतं मिळवायची. दानवेंजीनी शेतकरी महिलांना 1500 खात्यात आले का विचारल्यावर शेतकरी महिला हसायला लागल्या. त्यांनी 1500 मध्ये काय होते असे विचारले. 2014 ला 15 लाखाबद्दल बोलत होते, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार म्हणाले होते. 10 वर्षात 1500 रुपयांवर आले. 1500 रुपयाचं सरकार पुन्हा डोक्यावर बसलं तर 15 रुपयाचं चेक येतील.
काल घटनाबाह्य मुख्यमंत्री विचारत चालले होते पैसे मिळाले का? एका महिलेने हिंमत करुन सांगितले नाही मिळाले. मग प्रश्न बदलला, विचारलं पैशांचे तुम्ही काय करणार?. जेवढे पैसे महिलांना देतात त्याहून अधिक होर्डिंग आणि बॅनरवर खर्च करतात. लाडकी बहीण तर पाहिजेच. मी तुम्हाला शब्द देतो, आपलं सरकार आलं तर वाढीव देऊ. पण लाडकी बहीण सोबत आपल्याला सुरक्षित बहीणही पाहिजे. हे सरकार महिलांचं संरक्षण करण्याऐवजी बलात्काऱ्यांचं संरक्षण करत आहेत.
बदलापूरमधील शाळेतील सीसीटीव्ही गायब झाले. पोलिसांना सात दिवस एफआयआर घेतला नाही. ज्या दिवशी एफआयआर घेतलं त्या दिवशी पीडित मुलीच्या आईला 10 तास बसवले. हे निर्लज्य सरकार आहे. हे सरकार कधी आपलं लाडका भाऊ होऊ शकतो का. किसन कथोरे म्हणतात बदलापूरमधील आंदोलन राजकीय होतं, भाजपविरोधी होतं. वामन म्हात्रे महिला पत्रकाराला जे म्हणाले ती भाषा होऊ शकते का? पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर कुणी अत्याचार करेल त्याला महिलांमध्ये सोडून द्या किंवा भरचौकात फाशी द्या. उद्धव साहेबांच्या नेतृत्वातील सरकार असताना 2020 मध्ये शक्ती कायदा आणला. राज्यपालांनी तो कायदा राष्ट्रपतींकडे पाठवला. 2024 आलं तरी त्या कायद्यावर राष्ट्रपतींची सही झाली नाही. तीन वर्ष महिलांसाठी आणलेला कायदा प्रलंबित आहे.
बिलकीस बानोच्या आरोपींना सजा संपायच्या आत गुजरात सरकारने तुरुंगातून बाहेर आणलं, प्रचारासाठी गावोगावी फिरवलं. हे लाडके भाऊ आहेत का. रेवण्णा नावाच्या राक्षसाने अडीच हजार महिलांवर अत्याचार केले त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान कर्नाटकात गेले. त्याला जिंकून आणण्याचा प्रयत्न केला. बदलापूरमध्ये लाडक्या बहिणी रेल रोको करत होत्या, त्या बहिणींवर लाठीचार्ज करायला लावले. बदलापूरमध्ये अत्याचाराविरोधात आंदोलन होत असताना मुख्यमंत्री फार्म हाऊसवर होते. बदलापूरमध्ये आंदोलन होत असताना गृहमंत्री दिल्लीत राजकीय चर्चा करत होते. जे चाललंय ते मान्य आहे की बदल करायचाय हे तुम्हाला ठरवायचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.