बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेचा सोलापुरात शुभारंभ

सामना ऑनलाईन । सोलापूर

पाऊस लवकर यावा यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करत आहोत, पण तो लवकर नाहीच आला तरी चिंता करू नका. पाऊस येईपर्यंत दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्यांतील पशुपालकांना ‘महाप्रसाद’ देण्याची सेवा सुरूच राहील, असे अभिवचन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिले.

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, मदतीचा हात पुढे करण्यासाठी आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील होटगी रोडवर असलेल्या शेगावकर यांच्या शेतात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद वाटप’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

भूम तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद
आदित्य ठाकरे यांनी भूम तालुक्यातील वालवड, चिंचपूर ढगे व हाडोंग्री येथील चारा छावणीस भेट देऊन तेथील पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसेना कायम शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून शिवसेनेच्या दृष्टीने शेतकऱ्यांना ’अ’ दर्जा आहे. आता सध्या चारा छावणीमध्ये तीन -चार किलोमीटरवरील जनावरांचेसुद्धा संगोपन केले जाते. प्रत्येक पशुपालकाला घरी जाणे किंवा घरून जेवणाचा डबा आणणे शक्य नाही. त्यामुळे राज्यात जेवढय़ा चारा छावण्या आहेत त्या सर्व चारा छावणीतील पशुपालकांना शिवसेनेच्या वतीने रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून जोपर्यंत राज्यात हा दुष्काळ आहे तोपर्यंत पशुपालकांच्या रात्रीच्या भोजनाची सोय शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख महेश कोठे, समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारांचे कौतुक
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि ओमराजे निंबाळकर यांचे कौतुक केले. खासदार शेवाळे यांनी त्यांचे पहिले वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली आहे, तर निंबाळकर यांनी त्यांना जेवढी मते मिळाली आहेत तेवढेच वृक्ष मतदारसंघात लावण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विहिरीत पाणी टाकले म्हणजे दुष्काळ हटला असे होत नाही. तो तात्पुरता उपाय झाला, मात्र पर्यावरणाचा विचार करून वृक्ष लागवड हा दीर्घकाळचा उपाय आहे. ही फार मोठी गोष्ट आहे.

निवडणूक लढवणार का?
यावेळी पत्रकारांनी ‘‘तुम्ही निवडणूक लढवणार का?’’ असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक मी लढवावी का, यावर मी आताच बोलणार नाही, पण तरुणांनी त्या त्या क्षेत्रात पुढे यावे. शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचे नाव धनुष्यबाण आहे.’’

आपली प्रतिक्रिया द्या