आदित्य ठाकरे यांची नगरमध्ये 21 व 22 जुलै रोजी जनआशीर्वाद यात्रा

109
aditya-thackeray-pachora-speech

सामना प्रतिनिधी, नगर

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदार राजांचे मन जिंकण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा दि 22 जुलै रोजी नगरमध्ये येणार असल्याची माहिती शिवसेनेचे युवा जिल्हा अधिकारी विक्रम राठोड व रवी वाकळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर, उपशहर प्रमुख सुमित धेंड, विभाग प्रमुख अक्षय नागापुरे, युवा सेना जिल्हा संघटक सुमित कुलकर्णी, नगरसेवक श्‍याम नळकांडे आदी उपस्थित होते. जिल्हा अधिकारी विक्रम राठोड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा राज्यभर सुरू झालेली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे समाजाच्या प्रत्येक घटकांशी आदित्य संवाद च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

दि 21 जुलै रोजी पारनेर येथे दुपारी 4 वाजता त्यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रा तसेच विकास कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर ते नगर येथे मुक्कामी थांबणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आदित्य संवादाचे आयोजन नगरच्या सावेडी भागातील माऊली संकुल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमवेत समवेत शिवसेनेचे नेते तसेच वरूण सरदेसाई, सिद्धेश कदम, विहान सरनाईक संपर्कप्रमुख रुपेश पाटील आदी यावेळी उपस्थित राहणार आहे.

यामध्ये महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नेते तसेच युवा सेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये जाणार आहेत. तत्पूर्वी एमआयडीसी जवळील नागापूर येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, असे राठोड म्हणाले.

या दौऱ्याच्या निमित्ताने नगर शहरातील इंजिनीरिंग महाविद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थी हे शिवबंधन बांधणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले. तसेच चार ते पाच पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्ष प्रवेशसुद्धा यावेळी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहरामध्ये उद्योग वाढावेत व नवीन रोजगार निर्मिती व्हावी, याकरता आम्ही नगर येथे रोजगार मेळावा घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे विक्रम राठोड यांनी यावेळी सांगितले. नगर शहरामध्ये उद्योग आणण्यासाठी तसेच आयटी पार्कसाठी आम्ही पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या