‘संभाजीनगर’चा निर्णय एकमताने घेणार! आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर हे आवडते शहर आहे. त्यामुळे  राज्यातील महाविकास आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय एकमतानेच घेईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

चिकलठाणा येथील 150 मे. टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संभाजीनगर नामकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली. संभाजीनगर नामकरण हे महाविकास आघाडी सरकार एकमताने निर्णय घेऊन करणार आहे.

पहिले म्हणजे शहराचा चेहरा बदलण्यावर आम्ही लक्ष दिले असून त्यानुसार काम करीत आहोत. आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व पक्ष एकत्र मिळून चांगले काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजीनगर कचरामुक्त करण्यासाठी चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी हे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शहर कचरामुक्त करण्याची जबाबदारी जशी शासन, महापालिकेची आहे, तशी नागरिकांनीही दक्षता घ्यावी. घरातील ओला-सुका कचरा वेगळा करुन कचरा डेपोवर कसा जाईल व तेथून त्या कचऱयावर प्रक्रिया कशी होईल, यावर लक्ष ठेवावे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

24 तास जनतेची सेवा करीत राहू

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवशी संभाजीनगर नामकरण होणार का? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, 23 तारखेला प्रत्येक दिवशी जसे काम होते त्यापेक्षा अधिक जोमाने शासनाकडून काम होईल. प्रत्येक दिवस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा होता. तशाच पध्दतीने 24 तास आम्ही जनतेची सेवा करीत राहू.

विरोधी पक्ष म्हणून भाजपच काम चांगलं

चांगली गोष्ट होत असताना त्यास भाजपकडून विरोध केला जातो. त्यांच्याकडून कितीही विरोध झाला तरी आम्ही जनतेसाठी चांगले काम करीत राहू. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री यांना चांगले गुण मिळाले आहेत. चांगल्या कामांना भाजप विरोध करीत असला तरी माझ्या त्यांना शुभेच्छा. विरोधी पक्ष म्हणून भाजप चांगले काम करीत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. कोरोना काळात सरकार चांगल काम करत असताना भाजपकडून केवळ राजकारण करण्यात आल्याचे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करणार

महापालिकेची निवडणूक जवळ आली म्हणून उद्घाटने, भूमिपूजन केले जात नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोविडमध्ये एक वर्ष गेले. या काळातही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसी, एमएसआरडीसी, मनपा या तीन एजन्सीमार्फत रस्त्यांचे मोठे काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर हे आवडते शहर होते. त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून काम करीत आहोत आणि ते करणारच असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पाच वर्षांत नामकरण का नाही केले?

संभाजीनगर कधी होणार, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, संभाजीनगर होणारच. पण आता दुसरा पक्ष जसा विचारतो,  त्यांनी पाच वर्षांत हे का नाही केले? शिवसेनेने मागणी रेटली नाही, असे जर ते म्हणत असतील तर राममंदिरचा विषय शिवसेनेने हाती घेतला, तो झाला, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

सर्वांनीच संभाजीनगर म्हटले पाहिजे

सर्व नागरिकांनी संभाजीनगर म्हटले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. 15 लाख नागरिकांनी संभाजीनगर म्हटलं पाहिजे. आपलं संभाजीनगर म्हणा, सुपर संभाजीनगर म्हणा, स्मार्ट संभाजीनगर म्हणा किंवा नमस्ते संभाजीनगर म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. हे लोण पसरत पसरत ज्या दिवशी सर्वच्या सर्व नागरिक हे माझं संभाजीनगर आहे आणि अभिमान वाटेल असं शहर तयार होत आहे असे म्हणतील याच्यासारखा सुखाचा क्षण नसल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

शिवसेनाप्रमुखांनी 25 वर्षांपूर्वीच या शहराचे संभाजीनगर असे नामांतर केले आहे. आता मुख्यमंत्री आग्रही असून, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यावर लवकर निर्णय घेईल अशी खात्री देसाई यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या