मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने; आदित्य ठाकरेंकडून पालिका प्रशासनासोबत आढावा

मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात असल्यामुळे मार्चपासून शाळा कोविडपूर्व स्थितीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी आवश्यक खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनाच्या दोन भयंकर लाटा पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर डिसेंबरअखेरपासून कोरोनाची सर्वाधिक प्रसार असणारी तिसरी लाट आली. यामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला 250 पर्यंत असणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट 20 हजारांपार पोहोचल्याने पालिकेसह राज्य सरकारचेही आव्हान वाढले होते. मात्र एका महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली. सद्यस्थितीत दररोज 30 हजारांपर्यंत चाचण्या होत असताना 100 ते 150 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कचाटय़ात सापडलेल्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात झाली आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित पुंभार, चंद्रशेखर चौरे उपस्थित होते.

शून्य मृत्यूचा षटकार,  128 बाधित

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असताना एकाच फेब्रुवारी महिन्यात सहाव्यांदा शून्य मृत्यू नोंद झाल्याने मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. तर गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 21 हजार 508 चाचण्यांमध्ये केवळ 128 बाधित आढळले आहेत.

मुंबईत यापूर्वी फेब्रुवारीत 15, 16, 17, 20 आणि 23 फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली होती. तिसऱया लाटेत 2 जानेवारीनंतर 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. तर मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर डिसेंबर 2021 रोजी सात वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य

कोरोनापूर्व स्थितीप्रमाणे शाळा सुरू करताना वेळापत्रक, उपस्थिती, अभ्यासेतर उपक्रम, स्कूल बसेसची सुविधा याबाबत चर्चा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियम पाळूनच शाळा सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाय कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असणाऱया विद्यार्थ्यांना डोस देण्यासाठी पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिकेचा शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या सहाय्याने शाळांच्या आवारात 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.