
नवे सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचे विषय मागे पडले आहेत. नाशिक जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या कंपनी दुर्घटनेसंदर्भात आम्ही विधानसभा व विधानपरिषदेत आवाज उठवणार आहोत. उद्योगांमध्ये 80 टक्के रोजगार स्थानिकांनाच मिळावा असं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्व उद्योगांना आम्ही बंधनकारक केलं होतं. आता सत्तेत बसलेलं सरकार स्वतःसाठी रोजगार शोधत आहे. त्यासाठी त्यांच्या दिल्ली, सुरत आणि गुवाहाटी येथे वाऱ्या सुरु आहेत. मात्र ते राज्यातील लोकांसाठी काहीच मागत नाहीत. हे जर बदलायचं असेल तर तुम्ही एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असे मत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. नाशिकच्या इगतपुरी येथे शिवसंवाद यात्रेत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, जिथे जिथे मी जातो तिथे महिला शिवसेनेसोबत मोठ्या प्रमाणात आहेत व त्यांचा उद्धव ठाकरेंवर जास्त विश्वास असल्याचे दिसत आहे. जे गेले ते गद्दार आहेत आणि राहिले ते शिवसैनिक आहेत. दौऱ्याच्या वेळी लोकं मला भेटून सांगतात की तुमचं सरकार पुन्हा आलं पाहिजे, कारण उद्धव ठाकरेंसारखा नेता आम्ही कधीच पहिला नाही. आम्ही कोणत्याही एका जिल्ह्याचा विचार करत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा यादृष्टीने आम्ही विचार करतो. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण साडे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो. फक्त घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात काम देखील सुरु झालं आहे. आणि लवकरच तिथे कारखाने उभे राहिलेले दिसून येतील. हेच काम सुरळीत सुरु असताना आपल्या पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार पाडण्यात आलं.
राज्याचे मुख्यमंत्री 28 तास दावोसला गेले होते. तेथे 40 कोटी खर्च झाला. मात्र राज्यासाठी किती उद्योग आणले हे ते सांगू शकत नाहीत. मात्र महाराष्ट्र यांना फसणार नाही. आम्हाला मिळणारी मदत कुठे आहे? असे प्रश्न आज शेतकरी विचारात आहेत. अतिवृष्टी दुष्काळ गारपीट याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. आज कृषिमंत्री कुठे दिसत नाहीत. ते जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का? असे विचारतात. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यामुळे आता या मंत्री मंडळाचा विस्तार तर होणारच नाही पण हे सरकार देखील पडेल. फक्त सगळ्यांना गाजर देऊन ठेवले आहेत. हे सरकार दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं हा प्रश्न आहे. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आता एकजूट दाखवून पुढल्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा विधानभवनावर भगवा फडकवायचा आहे. राजकारण न करता जनतेची सेवा करत गेलो त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी गद्दारी केली. मात्र आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत राहिलं पाहिजे. त्यांच्या जवळ द्यायला पापाच्या पैशाचे खोके आहेत, मात्र माझ्याकडे द्यायला फक्त शब्द आहे. कारण जेजे आश्वासन आपण देतो ते पूर्ण करून दाखवतो. असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.