निष्काळजी मिंधे सरकारला शेतकऱ्यांसमोर गुडघ्यावर आणणारच!

तुम्ही आमचे अन्नदाता आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. काही बरं वाईट करण्याचा विचार करू नका. आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे आहोत, असा धीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सिन्नर व निफाडमधील शेतकऱ्यांना दिला. या निष्काळजी सरकारला हलवायचेय, त्यांचे डोळे उघडायचे आहेत. तुमच्यासमोर या सरकारला गुडघ्यावर आणू, ते आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, ते करणार म्हणजे करणारच, असा इशारा त्यांनी दिला.

नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये बांधावर आणि शेतात जाऊन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अमुक तमूक हजार कोटीचे पॅकेज देतो, असे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व बाहेरही जाहीर केले. पण नुकसानभरपाईचा एक रुपयाही शेतकऱ्याला मिळाला नाही. आता या दुष्काळातही कुठलीच मदत मिळत नाही, कर्जमुक्ती होत नाही. भयानक परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या दारी सत्ताधारीच नाही. मात्र, शासन आपल्या दारीच्या जाहिरातींवर राज्यभर शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषीमंत्री कोणीच तुमच्या दारी येत नाही. मग, शासन कोणाच्या दारी चाललंय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

उद्योगपती आणि मुख्यमंत्र्यांच्या कॉण्ट्रक्टर मित्रांचे कर्ज माफ होऊ शकतं, तर शेतकऱ्यांचं कर्जही माफ करायलाच हवं. नुकसानभरपाई द्यायलाच हवी. दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या सुरू करायला हव्या. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या या सुटल्याच पाहिजेत, असे आदित्य ठाकरे यांनी सरकारला ठणकावले. या संवाद दौऱ्यावेळी माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार योगेश घोलप, तालुकाप्रमुख सुधीर कराड, दीपक खुळे, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, खंडू बोडके पाटील, राहुल ताजनपुरे, दीपक शिरसाट, दत्तु भुसारे, आशिष शिंदे, भाऊसाहेब कमानकर आदींसह शेकडो शेतकरी हजर होते.

शेतकऱ्यांसारखं कर्ज त्यांच्या आवडत्या उद्योगपतींवर असतं, तर एका मिनिटात ते माफ केलं असतं, तेही हजारो कोटींचं. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे रस्त्यांचे वगैरे कॉन्ट्रक्टर असता तर कर्ज माफ झालं असतं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे, ते तुम्हाला धीर देण्यासाठी. एवढंच तुम्हाला सांगायला आलोय, हे सरकार हलवायचे आहे, सरकारचे डोळे उघडायचे आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शेतात बसून म्हणणे ऐकले
सिन्नर तालुक्यातील वडांगळी, कोमलवाडी येथे किशोर कातकाडे, हिवरगाव येथे शांताराम खळे यांच्या उद्ध्वस्त सोयाबीन पिकाची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेकडो शेतकरी त्यांना समस्या सांगत होते. आदित्य ठाकरे यांनी सोयाबीनच्या शेतातच बसून शेतकरी व महिलांचे म्हणणे मोकळेपणाने ऐकून घेतले. जळालेले सोयाबीन हातात घेऊन एका शेतकऱयाने आदित्य ठाकरे यांच्यासमोर टाहो फोडला. मी पुरता कर्जबाजारी झालो आहे, दोन्ही मुलींचे लग्न कसे करू, असा आक्रोश त्याने केला. त्याला धीर देत आदित्य ठाकरे म्हणाले, घाबरू नका, आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठीशी आहोत.

आम्ही देशद्रोही आहोत का? शेतकऱ्यांचा संताप
निफाडच्या भेंडाळी येथे संजय कमानकर यांच्या टोमॅटोची, प्रवीण कमानकर यांच्या सोयाबीनची त्यांनी पाहणी केली. यानंतर तेथे जमलेल्या पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱयांशी संवाद साधला. दुष्काळ त्वरित जाहीर करावा, कांदा अनुदान एकरकमी मिळावे, पीकविम्याचे पैसेच मिळत नाहीत, ते मिळावेत. परराज्यात ऊस न पाठविण्याचे शासनाचे धोरण रद्द करावे, कर्जमाफी करावी, अखंडित वीज पुरवठा सुरू करावा आदी मागण्या यावेळी शेतकऱयांनी केल्या. शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे, दुष्काळाने संकट आणखी वाढले आहे. निष्काळजी सरकारकडून कुठलीही मदत होत नाही. शेतकरी आहोत हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही देशद्रोही आहोत का? असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सरकार फक्त प्रसारमाध्यमांसमोर घोषणा करते, प्रत्यक्ष मदत करीत नाही. बळीराजा, अन्नदाता म्हणणारे मंत्री बघायलाही तयार नाही, अशा व्यथा यावेळी मांडल्या.