शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आली असून या ठिकाणी न्युयॉर्कच्या धर्तीवर ‘मुंबई सेंट्रल पार्क’ बांधण्यासाठी पालिकेने मुंबईकरांकडून हरकती-सूचना मागवल्या आहेत. मात्र मिंधे सरकारने कितीही प्रयत्न केले तरी रेसकोर्सच्या मोकळय़ा जागेवर कोणतेही बांधकाम करू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी आज दिला आहे. रेसकोर्सची जागा मुंबईकरांचीच राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
मुंबईकरांच्या रेसकोर्सची मोकळी जागा मिंध्यांकडून कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आपण जानेवारीत उघड केला. त्यामुळे मुंबईकरांची ही मोकळी जागा वाचली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. मात्र रेसकोर्सच्या मोकळय़ा जागेचे आम्ही विभाजन होऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी बजावले आहे. शिवाय या ठिकाणी क्लबहाऊससाठी ज्या मेंबर्सनी पाठिंबा दिला त्यांची चौकशीदेखील आमचे सरकार आल्यावर करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
मोकळय़ा जागांवर मिंधे–भाजपचा डोळा
मुंबईतील मोकळय़ा जागांवर मिंधे–भाजप सरकारचा डोळा आहे. मात्र मुंबईतील कोणत्याच जागांवर बांधकाम करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पालिकेच्या माध्यमातून रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर मुंबई सेंट्रल पार्क उभारणे प्रस्तावित आहे. याबाबत 22 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मुंबईकरांनी पालिकेकडे हरकती–सूचना दाखल करण्याचे आवाहन केले आहे.