मध्य प्रदेशमध्ये आदिवासी विद्यार्थ्याला जिवंत पेटवले

 

सामना ऑनलाईन। मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्हयात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामुळे सातवीत शिकणा-या एका आदिवासी विद्यार्थ्याला जिवंत पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात हा विद्यार्थी ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृति चिंताजनक आहे. गोपाळ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील शासकिय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याघटनेनंतर आरोपी विद्यार्थी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बैतूल येथील मिडल स्कूल मोरडोंगरीमध्ये गोपाळ सातव्या इयत्तेत शिकतो. गोपाळ व शाळेतील एका विद्यार्थ्यामध्ये शनिवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. पण शाळेतील इतर मुलांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यानंतर हे दोघे आपआपल्या घरी निघून गेले यामुळे हा वाद संपल्याचे सगळ्यांना वाटले.पण सगळ्या मुलांसमोर अपमान झाल्याचे शल्य दुस-या मुलाच्या मनात होते. याचा सूड घेण्याचा निर्णय त्याने घेतला व योग्यवेळेची वाट पहाण्याचे त्याने ठरवले.

रविवारी दुपारी चार वाजता गोपाळ बाकुड नदीवर आंघोळ करण्यासाठी जात असताना वाटेत पुन्हा त्या मुलाची व त्याची नजरानजर झाली. पण गोपाळने त्याकडे दुर्लक्ष केले व तो नदीवर गेला.

गोपाळ नदीत उतरत असतानाच दुस-या मुलाने बाटलीत आणलेले पेट्रोल त्याच्या अंगावर टाकले व त्याला पेटवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हादरलेल्या गोपाळने मदतीसाठी आरडओरडा केला. गोपाळचा आवाज एकूण लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण तोपर्य़त गोपाळला आगीच्या ज्वाळांनी घेरले होते.गोपाळच्या अंगावर पाणी ओतून आग शमवण्यात आली व त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.