कामेल उर्दू शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये; शिक्षण विभागाचा आदेश

59

सामना प्रतिनिधी । परभणी

वांगी रोडवरील युसूफीया कॉलनीतील कामेल एज्युकेशन सोसायटीच्या अनुदानीत उर्दू माध्यमिक शाळा आणि विनाअनुदानीत उच्च माध्यमिक विद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये आणि पालकांनीही आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे आदेश परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी बुधवारी दिले आहेत.

शिक्षणाधिकारी वाहूळ यांच्या आदेशात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या 25 मे 2019 रोजीच्या आदेशानुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार ही शाळा अटी व शर्तीची पुर्तता करीत नाही. तसेच कामेल उर्दू माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांच्या नियमित कारभारात आर्थिक गैरव्यवहार असून त्या पार्श्वभूमीवर दोन्ही शाळांची मान्यता काढण्याबाबतची कारवाई करण्याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीने कामेल उर्दू प्रा. शाळा आणि कामेल उर्दू उच्च माध्यमिक शाळा या दोन्ही शाळेंची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल तातडीने शिक्षणाधिकारी माध्यमिक या कार्यालयास सादर करावा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या कामेल संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत एका शिक्षकाने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर खंडपीठाने 25 मे 2019 रोजी न्यायनिवाडा केला असून संस्थेची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आदेश बजावले आहेत. चौकशीअंती अहवाल सादर करण्यास विलंब झाल्यास त्यास चौकशी समिती जबाबदार राहील, असेही या आदेशात बजावण्यात आले आहे. या चौकशी समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी व्ही.के. भुसारे, शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश राठोड, डॉ. गोपाल कालानी, पत्रकार आसाराम लोमटे, आदर्श शिक्षक एस.एस. देशपांडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून वरील दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे या आदेशात बजावले आहे. त्यामुळे यंदा या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता नाही. कामेल संस्थेने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी ही कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या