त्या सुटकेसमधील अवयवांचे गूढ उकलले; मानलेल्या मुलीचे क्रूर कृत्य

3060

माहीम समुद्रकिनारी वाहून आलेल्या सुटकेसमध्ये जे मानवी अवयव सापडले होते ते कोणाचे होते याचा गुन्हे शाखेने शिताफीने उलगडा करीत अशाप्रकारे निर्दयपणे तुकडे करून फेकणार्‍या दोघा आरोपींच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी ही मृत व्यक्तीची मानलेली मुलगी असून तिने प्रियकराच्या मदतीने हे क्रूरकृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

माहीमच्या मगदुम शहा बाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला 2 तारखेला एक अज्ञात सुटकेस समुद्राच्या पाण्याने वाहून आली होती. पोलिसांनी ती सुटकेस उघडल्यावर त्यात पुरुषाचा डावा हात, उजवा पाय आणि गुप्तांग सापडले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-5 चे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, एपीआय गणेश जाधव, सुरेखा जौंजाळ, महेंद्र पाटील, उपनिरीक्षक महेश बंडगर व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांना त्या सुटकेसमध्ये अवयवांव्यतिरिक्त दोन शर्ट, दोन पँट आणि एक स्वेटर सापडले होते. त्या शर्टांवरील अल्मो मेन्स वेअर हे टेलर मार्क पोलिसांना ज्याचे तुकडे केले होते त्या अज्ञात व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याचा मुख्य दुवा ठरला. पोलिसांनी त्या टेलर मार्कवरून कुर्ल्यातील त्या टेलरचा शोध घेतला. त्यानंतर त्याच्याकडील दीड वर्षांतील शेकडो बिल पुस्तके बारकाईने पाहणी करून बेनेट रिबेलो या व्यक्तीचे ते शर्ट असल्याची खातरजमा करून त्याचे वाकोल्यातील घर गाठले. तेथे केलेल्या चौकशीत व बेनेटची मानलेली मुलगी आराध्या पाटील ऊर्फ रिया बेनेट रिबेलो हिला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर ते अवयव बेनेटचेच असल्याचे व मुलीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने हा सर्व प्रकार केल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार रिया आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

लैंगिक छळ आणि प्रेमाला विरोध

बेनेटने मला दत्तक घेतले होते, पण तो माझा लैंगिक छळ करायचा. तसेच माझ्या प्रेमप्रकरणाला त्याचा विरोध होता. त्याच्या जाचाला मी त्रासलेली होती. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने 26 नोव्हेंबरला बेनेटची वाकोल्यातील राहत्या घरात हत्या केल्याची कबुली रियाने दिली आहे.

तीन दिवस मृतदेहाचे तुकडे केले, मग…

26 तारखेला लाकडी बांबू व चाकूने मारून बेनेटची हत्या केली. तो लवकर मरावा यासाठी तिने बेनेटच्या तोंडावर मच्छर मारायचे ब्लॅक हिट औषध देखील मारले. त्यानंतर तीन दिवस दोघांनी मिळून चार धारदार सुरे गरम केले आणि त्या सुर्‍यांनी बेनेटच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर ते अवयव तीन वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून रिक्षाने खाडीत नेऊन फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे उमाप म्हणाले.

बिल पुस्तकांबरोबर सोशल मीडियाची मदत

टेलर मार्कवरून टेलर सापडल्यानंतर त्याच्याकडील बिल पुस्तकांची छाननी करण्यात आली. त्यातील एका बिलावर सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्टचा कपडा तंतोतंत मिळाला. त्या बिलावरील नाव व फोन नंबरवरून तो शर्ट वाकोल्याच्या द्वारका पुंज येथे राहणार्‍या बेनेटचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फेसबुकवर बेनेटचे खाते शोधून त्याआधारे त्याचा फोटो मिळवला. तसेच त्याच्या घराचा पत्ता शोधून आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिसांना या दोन बाबींचा उपयोग झाला.

आपली प्रतिक्रिया द्या