Goa Election 2022 – 5 वर्षात 70 टक्के आमदारांनी पक्ष बदलला, गोव्याच्या नावावर अनोखा विक्रम

गोव्याच्या वाटेला आलेली अस्थिर राजकारणाची परिस्थिती सर्वश्रुत आहे.गोव्यातील राजकरण प्रत्येक तासाला बदलत असते असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. अशा या अस्थिर गोव्यातील राजकारण्यांनी एक अनोखा विक्रम केला आहे. गेल्या पाच वर्षांत एक चतुर्थांश आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तर तब्बल 70 टक्के आमदारांनी पक्ष बदल करत गोव्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR report) या संस्थेने एक अहवाल तयार केला असून त्यातूनच या नव्या विक्रमाबाबत माहिती मिळाली आहे.

निवडणूक रंगात येईल तशी ही पक्ष बदलणाऱ्या आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक जाहीर होईपर्यंत 40 पैकी तब्बल 11 आमदारांनी आपापल्या पक्षांचे राजीनामे देऊन इतर राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 40 सदस्यांच्या सभागृहात आज केवळ 29 आमदार उरले आहेत. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी राजीनामा न देता स्वतःला टीएमसीमध्ये विलीन करून गोव्यात असं देखील घडू शकत याचा प्रत्यय दिला आहे.

गेल्या पाच वर्षांत गोवा विधानसभेत तब्बल 27 आमदारांनी पक्षांतर करून रेकॉर्ड केला आहे. काँग्रेस 10 आमदारांनी आणि मगोपच्या 2 आमदारांनी आपले गट भाजपमध्ये विलीन केले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये आपला गट विलीन केला. विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी कार्यकाळाच्या सुरुवातीलाच भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. विधानसभेच्या कार्यकाळाच्या शेवटी 11 जणांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यातील 4जण भाजपमध्ये 3 जण काँग्रेसमध्ये दोघेजण तृणमूल काँग्रेसमध्ये तर आप आणि मगो पक्षात प्रत्येकी 1 जण सामील झाले आहेत.