सर्वात श्रीमंत पक्षांच्या यादीत ‘या’ पक्षाने सपा आणि काँग्रेसलाही टाकले मागे, पटकावला दुसरा क्रमांक

राजकीय पक्ष, नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी यांच्याबाबतची विविध आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे काम असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR) ही संस्था करत असते. या संस्थेने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2019-2020 या वर्षासाठीचा हा अहवाल असून यामध्ये राजकीय पक्षांच्या संपत्तीचे विश्लेषण जाहीर करण्यात आले आहे. संस्थेच्या अहवालानुसार भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. या पक्षाची संपत्ती 4847.78 कोटी इतकी आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाचे नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या पक्षाने काँग्रेस आणि समाजवादी पक्षालाही पाठी टाकले आहे हे विशेष.

एडीआरने अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी 7 राष्ट्रीय पक्ष आणि 44 प्रादेशिक पक्षांची आकडेवारी गोळा केली होती. 2019-2020 या वर्षात 7 राष्ट्रीय पक्षांची एकूण मिळून संपत्ती ही 6988.57 इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे तर 44 प्रादेशिक पक्षांची मिळून संपत्ती ही 2129.38 कोटींची असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. देशात सर्वात जास्त संपत्ती ही केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाची आहे. या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 588.16 कोटी इतकी आहे.

प्रादेशिक पक्षांबाबत बोलायचे झाल्यास 2129.38 कोटींच्या एकूण संपत्तीपैकी 95 टक्के रक्कम ही 10 प्रमुख प्रादेशिक पक्षांची आहे. प्रादेशिक पक्षांबाबत बोलायचे झाल्यास समाजवादी पक्षाने यात अव्वल नंबर मिळवला असून त्यांची संपत्ती 563.47 कोटी इतकी आहे. तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षाची संपत्ती ही 301.47 कोटी इतकी आहे. AIADMK या पक्षाची एकूण संपत्ती ही 267.61 कोटी इतकी आहे. प्रादेशिक पक्षांनी जी संपत्ती घोषित केली आहे, त्यातील एक मोठा हिस्सा हा फिक्स डिजॉझिटमध्ये ठेवल्याचेही या अहवालात म्हटले आहे. प्रादेशिक पक्षांनी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेली एकूण रक्कम ही 1639.51 कोटींच्या घरात आहे.

संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मायावती यांचा बहुजन समाज पक्ष असून या पक्षाची संपत्ती ही 698.33 कोटी इतकी आहे. या पक्षाने संपत्तीच्या बाबतीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षालाही मागे टाकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बसपाने 618.86 कोटींची रक्कम फिक्स डीपॉझिटमध्ये ठेवल्याचे अहवालात म्हटले आहे. भाजपने 3253.00 कोटींची रक्कम फिक्स डीपॉझिटमध्ये ठेवली असल्याचं ADRने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून आलं आहे. हिंदी वृत्तसंकेतस्थळ जनसत्तावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.