भेसळयुक्त तूप कारखान्याचा पर्दाफाश, 150 लिटर बनावट भेसळयुक्त तूप जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

सण-उत्सवात भेसळयुक्त तूप कारखान्याचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कात्रज आंबेगाव परिसरातून तब्बल 150 लिटर बनावट भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. महेंद्रसिह देवरा (रा.आंबेगाव ) याच्या घरातून भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे.

कात्रज आंबेगाव परिसरात बनावट तूप बनविणारा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत तेथून 150 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले. भेसळयुक्त तूपासाठी डालडा व जेमिनी तेल मिक्स करून तयार करत असल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, रवींद्र चिप्पा, गणेश भोसले, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरबोले, विक्रम सावंत यांनी केली.

सणासुदीत भेसळयुक्त तूप बनविण्यात येत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून 150 लिटर भेसळयुक्त द्रव्य जप्त केले आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधून माहिती दिली आहे.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ