
धर्मादाय आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या विश्वस्त (ट्रस्टी) रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यातील अशा 400 रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासंदर्भात दिरंगाई होणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली जावी. यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास हा सभागृहाचा अवमान समजला जाऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.
सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत, विधानसभा सदस्य तसेच सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा प्राप्त होण्यासंदर्भात होणारी अडचणसंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
गरीब रुग्णांकडून शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला ही दोन कागदपत्रे पुरेशी असताना रुग्णालयांकडून कागदपत्रांसाठी अडवणूक होते, ती टाळली जावी आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी यावेळी आमदारांनी केली. धर्मादाय रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती देणारे अॅप तयार केले जाणार असून रुग्णांची कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचना निर्गमित करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बैठकीत सांगितले.