एसटीचा आरामदायी प्रवास खेडोपाडी पोहोचणार!

एसटी म्हटले की, डोळय़ासमोर उभी राहते ती काळकट, मळकट काचा तुटलेली, पत्रा फाटलेली लाल परी, पण आता या लाल परीचे रूपडे पालटणार असून खेडोपाडय़ात एसटीचा आरामदायी प्रवास पोहोचणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात तब्बल 2450 साध्या पुशबॅक सीट असलेल्या नव्याकोऱया गाडय़ा आणणार आहे. तसेच 200 हिरकणी आणि 50 स्लीपरही आणणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही आरामदायी प्रवासाचा अनुभव येणार आहे.

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात 16 हजारांहून अधिक बसगाडय़ा असल्या तरी सध्या 13 हजार 500 गाडय़ाच रस्त्यावर धावतात. त्यापैकी बहुतांशी गाडय़ा जुन्या असल्याने एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने तब्बल 2700 नव्याकोऱया गाडय़ा एसटीच्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 700 गाडय़ांची बांधणी प्रत्यक्ष सुरू झाली आहे. त्यामध्ये 450 साध्या पुशबॅक सीट असलेल्या आणि 200 निमआराम आणि 50 स्लीपर गाडय़ांचा समावेश आहे.

दापोडी कार्यशाळेत नवीन गाडय़ांची बांधणी

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 2017 मध्ये एसटीने आपल्या दापोडीसह सर्वच कार्यशाळेतील नवीन बस बांधणी बंद केली होती, मात्र राज्य सरकारने नवीन गाडय़ांसाठी सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी दिल्याने महामंडळाने नवीन गाडय़ांची बांधणी दापोडीसह तिन्ही कार्यशाळेत सुरू केली आहे.
5150 इलेक्ट्रिक बस भाडय़ाने घेणार

डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर एसटीने तब्बल 5150 इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेंडर काढले असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले. या गाडय़ा शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांतही धावणार आहेत. या गाडय़ा राज्यातील 101 डेपोला देण्यात येणार असून त्यासाठी 172 ठिकाणी चार्ंजग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.