मालेगावचे हिरे शिवबंधनात! उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून अद्वय हिरे यांचे शिवसेनेत केले स्वागत 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून अद्वय हिरे यांचे शिवसेनेत स्वागत केले. सोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत.

‘बरे झाले गद्दार गेले ही गोष्ट आज महाराष्ट्राच्या लक्षात आली. कारण त्यांच्यामुळेच शिवसेनेला हिरे सापडले,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना भीमटोला हाणतानाच शिवसेनेत प्रवेश करणारे मालेगावचे अद्वय हिरे यांचे कौतुक केले व त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. जे गद्दार गेले त्यांना आजपर्यंत आम्ही खूप पैलू पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पैलू पडलेच नाहीत आणि त्यांनाच आम्ही हिरा म्हणून नाचवत होतो, पण ते नकली दगड होते. ते बुडाले,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व्हे काहीही असोत, महाविकास आघाडी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकणार, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

  अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम करत आज दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाचाही समाचार घेतला. ‘भाजपसोबत आम्ही पंचवीस-तीस वर्षे भोगले. आम्ही त्यांनासुद्धा पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पण उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटले की, आम्ही कायमचे भोई आहोत. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती भाजपची नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली,’ असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

भाजपचा किळसवाणा पायंडा गाडून टाकू

भाजपकडून किळसवाणा प्रकार सुरू आहे असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘युवक-युवतींमध्ये असा संभ्रम आहे की राजकारण एवढे घाणेरडे आहे का?  पण मी म्हणतो राजकारण किंवा कोणतेही क्षेत्र वाईट नसते, घाणेरडे नसते. त्या क्षेत्रातील चांगली किंवा वाईट माणसेच त्या क्षेत्राला चांगले किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे भाजपने देशामध्ये पाडलेला अत्यंत घाणेरडा, किळसवाणा पायंडा गाडून टाकावा लागेल,’ असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

हिरेठाकरे कुटुंबाचे ऋणानुबंध जुने

हिरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे ऋणानुबंध जुनेच आहेत याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांसोबत प्रशांत हिरे यांच्या प्रवेशासाठी मालेगावला आलो होतो, असे ते म्हणाले. आमच्या पुढील पिढीची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे ते पुढे म्हणाले. त्यावेळी प्रशांत हिरे शिवसेनेत आले होते मग मधल्या काळात ज्यांनी बिब्बा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवावे लागणार आहे, असा निशाणाही त्यांनी भाजपवर साधला. भाजपला माणुसकी राहिली नसून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरा आणि फेका असेच ते करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल

आता आपल्याला केवळ मालेगावपुरते काम करावे लागणार नाही असे सांगत, अद्वय हिंरे यांना आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र बघावा लागेल आणि ते तरुण असल्याने त्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महिनाभरात मालेगावात सभा घेऊ

अद्वय हिरे यांच्या प्रवेशावेळी शिवसेना भवनात मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकाने खांद्यावर शिवसेनेचे भगवे उपरणे परिधान केले होते. त्या गर्दीमध्ये प्रचंड उत्साह होता. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’, ‘या खोकेसुरांचे करायचे काय…खाली डोपं वर पाय…’ अशा घोषणांनी त्यांनी शिवसेना भवन दुमदुमवून सोडले होते. शिवसैनिकांचा तो उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनीही येत्या महिनाभरात मालेगावात मोठी सभा घेऊन तिथे मोकळय़ा मैदानात मनमोकळेपणाने बोलू, असे म्हणताच शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजया करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे उपस्थित होते.

अन्नाची शपथ घेऊन गद्दारी

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेनेशी गद्दारी केलेले मालेगावचे आमदार व विद्यमान मंत्री दादा भुसे यांचा ‘गद्दार’ म्हणून उल्लेख करत त्यांचा निषेध केला होता. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही ज्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला त्यांचे नाव घेण्यास मी इच्छुक नाही, पण त्यांनी माझ्यासमोर अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणार नाही असे सांगितले होते. तरीसुद्धा ते गेले. आता अन्नाची शपथ खरी असते की नसते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी त्यात जाऊ इच्छित नाही.’

तर महाविकास आघाडीला 48 जागा मिळतील

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील जनता निवडणुकीची वाट बघत आहे. मी मुख्यमंत्री असतानाही सर्व्हे होत होते. आताही होताहेत. आताही एक सर्व्हे आलाय. आत्ता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील असे त्यात म्हटले आहे. किमान हा शब्द त्यांनी घाबरूनच वापरला आहे. पण आपण घट्ट राहिलो तर लोकसभेच्या कमीत कमी 40 जागा महाविकास आघाडीला मिळतील. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. त्या जनतेने भाजपचा त्रिफळाच उडवायचे ठरवले तर 48 जागाही महाविकास आघाडीला मिळतील.’