अद्वय हिरे यांना अटक, राजकीयदबावामुळे गुन्हा दाखल

मालेगावातील रेणुका सहकारी सूत गिरणीसाठी घेतलेले साडेसात कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली आहे. राजकीय दबावामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर दाभाडी मतदारसंघाचे आमदार मंत्री दादा भुसे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते बिथरले. हिरे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी सत्तेचा दुरुपयोग सुरू केला. त्यांच्या दबावामुळे आतापर्यंत अद्वय हिरे यांच्याविरुद्ध तब्बल बत्तीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीस गुह्यांत त्यांच्यासह इतरांना जामीन मिळाला आहे. रेणुका सूत गिरणीप्रकरणी जिल्हा बँकेने राजकीय दवाखालीच अद्वय हिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी हिरे यांना बुधवारी भोपाळ येथून अटक केली. जिह्यातील अनेक राजकीय मातब्बर या बँकेचे थकबाकीदार असताना एकटय़ा अद्वय हिरे यांच्याविरुद्धच गुन्हा का दाखल झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.