
गिरणा मोसम साखर कारखान्याच्या शेअर्सच्या नावाखाली जमा केलेल्या 178 कोटी 25 लाख 50 हजार 10 रुपयांचा हिशेब मंत्री दादा भुसे यांनी 16 सप्टेंबरच्या मालेगावातील सभेत द्यावा, असे रोखठोक आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी दिले आहे. आपल्या वतीने वकिलांनी ईडीकडे दाखल केलेल्या लेखी तक्रारीचा पुरावाच हिरे यांनी जाहीर केला. दरम्यान, गिरणा बचाव समितीच्या नावाने जमा केलेल्या पैशांची तक्रार अद्याप केली नसून, तीही पुराव्यानिशी लवकरच दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गिरणा सहकारी साखर कारखान्याचा लिलाव थांबविण्यासाठी दादा भुसे यांनी गिरणा बचाव समिती स्थापन केली. कारखाना वाचविण्यासाठी, निधी उभारण्यासाठी पुढे येण्याचे जाहीर आवाहन केले. मालेगावातील प्रतिष्ठत व्यक्ती, शेतकरी, मजूर हे या भावनिक आवाहनाला बळी पडले. गिरणा मोसम शुगर ऍग्रो ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावाने हजारो लोकांकडून शेअर्ससाठी पैसे जमा करून 178 कोटी 25 लाख 50 हजार 10 रुपये या शुगर ऍग्रोचे प्रवर्तक, प्रभारी दादा भुसे यांनी हडपले, असा त्यांच्यावर आरोप आहे. येत्या 16 सप्टेंबरला सभासदांची बैठक घेवून हा घोटाळा झालाच नाही, आपला त्यात संबंधच नाही, असा खुलासा दादा भुसे हे जाहीर सभेतून सभासदांसमोर करणार आहेत, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. याला प्रत्युत्तर देताना अद्वय हिरे यांनी भुसे यांना आव्हान दिले आहे.