मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले साडेसात कोटी रुपये थकविल्याप्रकरणी अटक केलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना गुरुवारी मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
मालेगावच्या द्याने येथील रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी साडेसात कोटी रुपयांचे कर्ज नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेण्यात आले होते. हे कर्ज थकविल्याप्रकरणी मालेगावातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 30 पैकी 29 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सूत गिरणीचे संचालक असलेले अद्वय हिरे यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी हिरे यांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या वतीने अॅड. एम. वाय. काळे यांनी जोरदार युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
संपूर्ण शिवसेना अद्वय हिरे यांच्या पाठीशी
अलीकडेच भाजपमधून शिवसेनेत आलेले अद्वय हिरे यांना नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा झाल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी भोपाळमधून अटक केली. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. संपूर्ण शिवसेना हिरे यांच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिरेंवर कारवाई होते, पण ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांच्यावर कारवाई सोडा, पण साधी चौकशीही होत नाही, असा आरोप करतानाच, आमचे सरकार आल्यानंतर या सर्वांचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
कर्ज साडेसात कोटींचे; फसवणूक साडेएकतीस कोटींची!
रेणुका देवी सहकारी सूत गिरणीने सात कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. व्याजासह थकबाकीची ही रक्कम 31 कोटी 40 लाख 76 हजार इतकी गृहीत धरण्यात आली. तितक्याच रकमेची फसवणूक झाल्याचे भासवून तशीच तक्रार देण्यात आली. बँकेने तडजोड करून अनेकांना व्याज माफ करून थकबाकीची रक्कम स्वीकारून त्यांचे खाते बंद केले. मग, व्याज माफ करून कमी रक्कम भरून घेणाऱया अधिकाऱयांनीच जिल्हा बँकेची फसवणूक केली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भुसेंच्या दबावतंत्राचा निषेध
जिह्यातील अनेक राजकीय नेते हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत, त्यांच्या कुणावरही अद्याप कारवाई झालेली नाही. मिंधे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत होणाऱया पराभवाच्या भीतीने प्रशासकीय यंत्रणेवर दबाव टाकला, अद्वय हिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा आरोप करीत हजारो नागरिकांनी भुसे यांच्या दबावतंत्राचा जोरदार निषेध केला. न्यायालयाबाहेर जमलेल्या या जनसमुदायाने ‘दादा भुसे मुर्दाबाद’, ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. ‘अद्वय हिरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दाभाडी, मालेगावसह अन्य तालुक्यातूनही मोठय़ा संख्येने नागरिक हिरे यांच्या समर्थनार्थ येथे दाखल झाले होते.