दीपिका पदुकोणच्या जाहिराती गायब? JNU तील उपस्थितीने जाहिरात कंपन्या बॅकफुटवर

1487
deepika-padukone

एखाद्या प्रोडक्टच्या जाहिरातीत झळकण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी मोठे करार करतात. बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेली दीपिका पदुकोण ही सर्वाधिक किंमतीचे करार करते असं बोललं जातं. दीपिकाने आपल्या प्रोडक्टची जाहिरात करावी यासाठी कंपन्या उत्सुक असतात असंच चित्र गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं. मात्र एका घटनेनंतर दीपिकाला जाहिरातीत घेण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्या आता मात्र दक्षता बाळगू लागल्याचे वृत्त एका खासगी संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. CAA – NRC वरून जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतरच्या आंदोलनावेळी दीपिका पदुकोणची उपस्थिती यानंतर संमिश्र प्रतिक्रिया देशभरातून आल्या. दीपिकाच्या चित्रपटावर बंदीची मागणी देखील भाजप समर्थकांडून करण्यात आली. दीपिकाच्या जेएनयूतील उपस्थितीमुळे ती वादात सापडल्याने विविध ब्रँड्स आता दक्षता बाळगू लागले आहेत.

या वृत्तानुसार काही ब्रँड्सने दीपिकासोबत असलेल्या आपल्या जाहिरातींची संख्या घटवली आहे. तसेच सेलिब्रिटींच्या मॅनेजर्सनी देखील आता जाहिरातीचे करार करताना या गोष्टींची स्पष्टता करण्यासाठी विशेष क्लॉज जोडण्याचं देखील निश्चित केलं आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटींच्या राजकीय भूमिकेने प्रशासनाच्या नाराजीमुळे ब्रँडला होणाऱ्या नुकसानाचा देखील विचार केला जाईल. कोका-कोला, अॅमेझॉन इत्यादी क्लायंट असलेल्या IPG मीडिया ब्रँड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांचे मत देखील या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘सामान्यत: ब्रँड्स अत्यंत सुरक्षित पावलं टाकतात. कोणत्याही वादापासून दूर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो’, असं त्यांनी नमूद केला आहे.

एका मीडिया बाइंग एजन्सीच्या कार्यकारी अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, एका ब्रँडने आम्हाला सांगितले आहे की, दीपिकासोबत असलेल्या त्यांच्या जाहिराती दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात याव्यात. तोपर्यंत वाद शमलेला असेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. दीपिका सध्या ब्रिटीनियाच्या गुड-डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स आणि अॅक्सिस बँकसह 23 ब्रँड्स सोबत जाहिरात करते. एका चित्रपटासाठी दीपिका 10 कोटी रुपये तर जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेत असल्याचा अंदाज या वृत्तात व्यक्त करण्यात आला आहे.

जेएनयूचा वाद सुरू असतानाच दीपिकाची तिथे असलेली उपस्थिती भाजप नेते आणि समर्थकांना खुपली. त्यांनी तशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. सोशल मीडियावर काही जणांनी दीपिकाला ट्रोल केलं तर काहींनी दीपिकाची बाजू लावून धरली.

आपली प्रतिक्रिया द्या