जाहिरातीचा फ्लेक्स ओव्हरहेड वायरवर कोसळला, मध्य रेल्वेची लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी झाली विस्कळीत

टोलेजंगी होर्डिंग्जवरील जाहिरातीचा फ्लेक्स सोसाट्याच्या वार्‍याने थेट ओव्हरहेड वायरवर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मस्जिद व सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान हा विचित्र प्रकार घडल्याने अप आणि डाऊन लोकलच्या मोटरमननी वेळीच लोकल रोखल्याने पुढील बाका प्रसंग टळल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी 10.58 ते 11.23 दरम्यान ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा बंद करण्यात करून हा फ्लेक्सचा बॅनर हटविण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सेवा पुर्ववत सुरू झाली.

मध्य रेल्वेच्या मस्जिद व सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गिकेच्या कडेला रोडच्या शेजारील जाहिरातीच्या भल्या मोठ्या होर्डिंग्जचा फ्लेक्स सोसाट्याच्या वार्‍याने फाटून तो थेट ओव्हरहेड वायरवरच कोसळला. अप दिशेने येणार्‍या ठाणे लोकलचे मोटरमन व्ही.एस.जकाते यांनी सँडहर्स्ट रोड येथे फ्लेक्स कोसळल्याचे पाहून समोरून येणार्‍या डोंबिवली डाऊन लोकलचे मोटरमन पी.एस.सपकाळ यांचे लक्ष वेधण्यासाठी फ्लॅशर लाईट ऑन ऑफ करीत इशारा केला. त्यानंतर गार्ड मिलिंद शेळके यांनी नियंत्रक कक्षाला आणि स्टेशन मास्तरांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे डाऊन दिशेला चाललेल्या डोंबिवली लोकलचे मोटरमन सपकाळ यांनी वेळीच ब्रेक दाबले. त्यानंतर होर्डिग्जचा जाहिरातीचा फ्लेक्स बॅनर हटविण्यासाठी ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा खंडीत करून हा बॅनर काढून टाकण्यात आला. त्यांनतर सवा अकरा वाजता मध्य रेल्वेची डाऊन दिशेची वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.