व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकील कलिंगड खायला बसला, न्यायमूर्ती म्हणाले….

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध राज्यांनी निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. न्यायालय प्रशासनानेही काही निर्बंध घातले असून प्रत्यक्ष सुनावणीऐवजी आभासी (व्हर्च्युअल) सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानेही याची अंमलबजावणी केली आहे. या न्यायालयातील न्यायमूर्ती बीएस वालिया यांच्या खंडपीठापुढे एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एक वकील कलिंगड खात बसला होता. वकिलांसह न्यायमूर्तींच्याही ही बाब ध्यानात आली होती.

सुनावणीदरम्यान कलिंगड खाणाऱ्या या वकिलाचा व्हिडीओ तिथल्या वकिलांच्या ग्रुपमध्ये व्हायरल झाला आहे. न्यायमूर्ती वालिया यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर गुरुवारी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला होता. सुनावणी दरम्यान या वकिलाने कॅमेऱ्यासमोर ठाण मांडत कलिंगड फस्त करायला सुरुवात केली होती. कलिंगड खाण्यात व्यस्त असलेल्या या वकिलाचे युक्तिवादाकडे अजिबात लक्ष नसल्याचं न्यायमूर्ती वालिया यांच्या लक्षात आलं होतं. यावेळी त्यांनी हसत हसत या वकिलाचं नाव घेतलं आणि म्हटलं की ‘कलिंगड एंजॉय करा’

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात जवळपास वर्षभर व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी होत होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली होती, मात्र दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा व्हर्च्युअल सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रकरणांच्या व्हर्च्युअल सुनावणीसाठी काही नियम घालून देण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष न्यायालयात जे शिष्टाचार पाळले जातात ते ऑनलाईन सुनावणी दरम्यानही पाळले गेले पाहिजेत असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. वकिलांनी सुनावणीदरम्यान एकांत असलेल्या खोलीत बसावे, तिथे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ देता कामा नये असे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या