आता गावातच शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र द्यावे लागणार: आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

60

सामना प्रतिनिधी । कुडाळ

शिधापत्रिकाधारकांना शासनाने बंधनकारक केलेले हमीपत्र आता गावातील रेशनधान्य दुकानांवर स्विकारण्याची आमदार वैभव नाईक यांची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने शिधापत्रिकाधारकांना तहसीलदार कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचले आहेत.

शिधापत्रिकेसाठी बंधनकारक असलेले अॅफेडेव्हिट करून देण्यासाठी कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांना कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे यावे लागत होते. ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना तहसीलदार कार्यालयात यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. यात त्यांना आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत होता. शिवाय वेळही वाया जात होता. त्यामुळे पुरवठा विभागाबाबतच्या लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी गवस यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. ग्रामीण भागातील जनतेला अॅपेडेव्हिटसाठी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे तसेच तहसीलदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे तहसीलदार कार्यालय येथे येऊन अॅपेडेव्हिट देण्याचे शिधापत्रिका धारकांना सक्तीचे करू नये, गावागावात असलेल्या रेशनधान्य दुकानांवर साध्या पेपरवर हमीपत्र लिहून घेण्यात यावे. यातून ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय दूर होईल. त्यादृष्टीने संबंधितांना सुचना द्याव्यात, जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आ.नाईक यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिल्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी गवस यांनी गावागावात असणाऱ्या रेशनधान्य दुकानांवर हमीपत्र घेण्याबाबतच्या सुचना सर्व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे मान्य करीत तात्काळ तशा सूचना कुडाळ तालुका पुरवठा अधिकारी व संबंधितांना त्यांनी दिल्या आहेत.

आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे शिधापत्रिकाधारकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. याबद्दल ग्रामस्थांमधून आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या