झोपडपट्टीमुक्त मुंबई, परवडणारी घरे; मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन 2030’

970

मुंबईकरांना 24 तास पाणी, खड्डेमुक्त रस्ते, दर्जेदार शिक्षण, अद्ययावत उपचार आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झोपडपट्टीमुक्त मुंबई करून प्रत्येकाला परवडणारे हक्काचे घर देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘व्हिजन 2030’वर  पालिकेत मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह राज्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक घेऊन मुंबईच्या विकासाबाबत प्रदीर्घ चर्चा केली.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच पालिकेत येऊन पालिकेच्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला. यातील अनेक प्रकल्पांवर पालिकेच्या अधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांना चित्रफितीच्या माध्यमातून सविस्तर सादरीकरण केले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबईच्या विकासाला चालना मिळण्यासाठी वाढत्या झोपडपट्टय़ांवर नियंत्रण आणण्याच्या मुद्दय़ावर यावेळी चर्चा करण्यात आली. झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या धोरणावर आता एक ‘डेडलाइन’ ठरवण्यावर यावेळी एकमत झाल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. हवामान खात्याने राज्याच्या समुद्री भागात दोन वादळांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर येणाऱया अनुयायांना कोणताही त्रास सहन करू लागू नये यासाठी पालिकेने केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागात जाऊन घेतला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पालिकेने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला असल्याचेही त्या म्हणाल्या. या बैठकीला शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आमदार ऍड. अनिल परब, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासह राज्याच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

परवडणाऱया घरांसाठी एकच प्राधिकरण
झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. परवडणाऱया घरांसाठी झोपडपट्टी प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगर विकास अशा विविध यंत्रणा काम करीत आहेत. याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बेस्ट’ला गतवैभव मिळणार
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफ लाइन असलेली ‘बेस्ट’ गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ला पालिकेकडून आवश्यक त्या प्रमाणात आर्थिक मदत करून, गाडय़ांची संख्या वाढवून पुन्हा सुगीचे दिवस प्राप्त होतील असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. बेस्टसह इतर महत्त्वाच्या उपक्रमांबाबत पालिका प्रशासनाडून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

रस्त्यांची जबाबदारी कंत्राटदारावर
रस्त्याचे काम केल्यानंतर हमी कालावधीत रस्त्याच्या देखभालीचे काम दहा वर्षे संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे. यामध्ये कंत्राटाच्या रकमेची 40 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून पालिका ठेवणार असून दहा वर्षांत चार टप्प्यांत ही रक्कम देण्यात येईल. जेणेकरून कंत्राटदाराकडून रस्त्यांची कामे दर्जेदार होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मजबूत रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबईकरांना मिळणार पुरेसे पाणी
मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी पालिकेच्या माध्यमातून गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा हे तीन नवे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास सर्व मुंबईकरांना पुरसे पाणी मिळेल असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला. स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जुन्या पाइपलाइनही बदलण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.

शनिवार, रविवार स्ट्रीट फेअर
मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर शनिवार, रविवार स्ट्रीट फेअर सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार असून मुंबईकरांना मनोरंजनाचे साधनही निर्माण होईल.

पर्यटनवाढीसाठी योजना
– मुंबईत पर्यटन स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे तीन एकर जागेवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे.
– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी सुरू करण्यात येणार आहे.
– कांदळवनांचे संरक्षण-विकासाबरोबरच फुटपाथ मजबुतीकरण-सौंदर्यीकरण करण्यासाठी प्राधान्य.
– मादाम तुसा वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर मुंबईतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॅक्स म्युझियम उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
– पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गाच्या उड्डाणपुलांखालील जागांची स्वच्छता करणे आणि या ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारणार.
– मुंबईतील रस्त्यांची चिन्हे एकसमान असावीत, रस्त्यांची, मंडईची रचना एकसमान असावी यावरही या बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या ‘‘डिझास्टर मॅनेजमेंट’ विभागाला भेट दिली. त्यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, आमदार ऍड. अनिल परब आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या