अफगाण-इराणमध्ये पाण्यावरून सीमेवर चकमक, गोळीबारात 4 जण ठार

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून, ‘पाणी हेच जीवन आहे’ असे म्हटले जाते. त्यामुळे या पाण्यावरून नेहमी वाद होतात. असाच वाद अफगाणिस्तान व इराण सीमेवर झाला असून, या वादात  4 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये झालेल्या गोळीबारात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक ठार झाले. दोन्ही देशांत हेलमंड नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे. इराणी माध्यमांनी या गोळीबारासाठी तालिबानला जबाबदार धरले तर तालिबानने हे युद्ध इराणने सुरू केल्याचा दावा केला.

तालिबानचा कमांडर हमीद खोरासानी म्हणाला की, तालिबान नेत्यांनी परवानगी दिली तर आम्ही अवघ्या २४ तासांत इराणवर विजय मिळवू. तालिबान कमांडर अब्दुल हमीद खोरासानी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. आम्ही ज्या उत्साहाने अमेरिकेविरुद्ध लढलो, त्यापेक्षा जास्त उत्साहाने इराणविरुद्ध लढू. तालिबान नेत्यांच्या संयमाबद्दल इराणने आभार मानले पाहिजेत. तालिबानी नेत्यांनी आम्हाला परवानगी दिली तर आम्ही इराणही ताब्यात घेऊ, असे खोरासानी म्हटले आहेत.

दुसरीकडे इराणनेही या लढाईत तालिबानला पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. इराणचे पोलीसप्रमुख अहमदरेजा रादान म्हणाले की, आमचे सीमा सुरक्षा पथक कोणत्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा फटका अफगाणिस्तानला सहन करावा लागेल. त्याला त्याच्या कृतीचे उत्तर द्यावे लागेल. महिनाभरापूर्वीच इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी तालिबानला हेलमंड नदीतील इराणच्या पाण्याच्या हक्काचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, तालिबान या लढाईत क्षेपणास्त्र, तोफा आणि मशीनगनचा वापर करत आहे. युद्धाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात सीमेजवळील रस्त्यांवर चिलखती वाहने दिसून येत आहेत. २०२१ मध्ये तालिबानने अफगाण ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने आपली बहुतांश शस्त्रे तिथे सोडली होती.