पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती, तोरखम सीमा सील केली

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तोरखम सीमा सील करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाल्याने या सीमेवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने ‘द खोरासान डायरी’ला सांगितले की, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी खुरासान तोरखम सीमेवर पोहोचले आहेत आणि परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा सील करण्यात आली होती. तणाव निवळल्यानंतर ही सीमा पुन्हा खुली करण्यात आली होती. पूर्व अफगाणिस्तानातील नांगहार भागातील तालिबान प्रशासनामधील एका व्यक्तीने सांगितले की तोरखम सीमा सील करण्यात आली आहे, याबाबत आम्ही नंतर चर्चा करू.

अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध हे तणावपूर्ण राहिलेले आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनारमध्ये हवाई हल्ले करून 36 तालिबान्यांना ठार मारले होते. पाकिस्तानने आपण असा हवाई हल्ला केल्याचा इन्कार केला होता. अफगाणिस्तानातील दहशतवादी सीमा ओलांडत पाकिस्तानात येतात आणि दहशतवादी हल्ले करतात असा आरोप पाकिस्तान करत आहे. तालिमानने याचा इन्कार केला असून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची सूत्रे हातात घेतल्यापासून या कारवाया थांबल्या असल्याचं अफगाणिस्तानने म्हटलंय. अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर तालिबानने काबूलस्थित पाकिस्तानी राजदूताला बोलावून हे हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले. वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी राजदूताला बोलावल्यानंतर अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुट्टाकी यांनी एक निवेदन जारी केले की, पाकिस्तानी राजदूताला खोस्त आणि कुनारमधील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवण्यास सांगण्यात आले आहे कारण यामुळे दोन देशातील संबंध बिघडत आहेत.