तालिबान्यांची सत्तेवरून आपापसात हाणामारी, बरादर आणि हक्कानी समर्थक राष्ट्रपती पॅलेसमध्येच भिडले

प्रचंड हिंसाचार घडवून अफगाणिस्तान बळकावणाऱया तालिबान्यांमध्ये आता आपापसातच जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य नेमके कुणामुळे माघारी गेले? याच्या श्रेयाबरोबरच सत्तेची वाटणी कशी करायची यावरून मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि खलील-उर-रहमान हक्कानीमध्ये संघर्ष चांगलाच पेटला आहे. दोन्ही गटांचे समर्थक राष्ट्रपती पॅलेसमध्येच समोरासमोर भिडले असून या अंतर्गत कलहाचा मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

taliban-terrorists-pti-image

तालिबान्यांच्या सरकारला काही दिवसच झाले आहे. तोच तालिबानी आपापसात भिडले आहेत. मागील 20 वर्षे अफगाणिस्तानात तळ ठोकून राहिलेल्या अमेरिकेच्या सैन्याला माघारी पाठवण्यास विशेष योगदान कोणी दिले? नव्या तालिबानी सरकारची वाटणी कशी करायची? आदी मुद्दय़ांवरून मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि खलील-उर-रहमान हक्कानी यांच्यात वाद उफाळला आहे. दोघांनी सरकारमागे स्वतःचेच श्रेय असल्याचा दावा केला आहे.

taliban-terrorists-in-car-pti-image

बरादर हा तालिबान्यांच्या नव्या सरकारमध्ये उपपंतप्रधान आहे, तर हक्कानीला शरणार्थी खात्याचा मंत्री बनवले आहे. हक्कानी हा दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा दहशतवादी आहे. बरादर हा अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळेच तालिबान्यांतील अंतर्गत कलह जगासमोर आला आहे.

बरादर मारला गेल्याचा सोशल मीडियात तर्क

मुल्ला बरादर हा काही आठवडय़ांपासून गायब असल्यामुळे संघर्षात तो मारला गेल्याचा अंदाज सोशल मीडियात वर्तविला जात आहे. तालिबानने मात्र तो सहीसलामत असल्याचा दावा केला आहे. बरादर काबूलमधून पंदहारला गेला होता. तेथून त्याने आपण प्रवासात असून ठीक असल्याचा मेसेज एका ऑडिओ क्लिपमधून दिला आहे. तो तालिबानच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी पंदहारला गेला आहे व सध्या थकल्यामुळे आराम करीत आहे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
अखुंदजादाचाही ठावठिकाणा नाही.

तालिबान्यांचा सुप्रीम लीडर हिब्तुल्लाह अखुंदजादाही गायब आहे. तो लवकरच जगापुढे येईल, असे तालिबानने म्हटले होते. मात्र 15 दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा नसल्यामुळे गूढ वाढले आहे. त्याचा एकतर संघर्षामध्ये खात्मा झाला असावा किंवा तो गंभीर आजाराने त्रस्त असावा, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षीही त्याचा पेशावरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती.

अफगाणिस्तानात झालेल्या मोठय़ा हल्ल्यांमागे ‘हक्कानी नेटवर्क’चा हात होता. हे हल्ले अफगाणी सैन्य व त्यांना साथ देणाऱया अमेरिकन सैनिकांना निशाणा बनवण्यासाठी केले होते. अमेरिकेने हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. परंतु याच संघटनेचा नेता सिराजुद्दीन हक्कानीला तालिबानी सरकारमध्ये गृहमंत्री बनवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या