१३ दिवसानंतरही कचराकोंडी कायम

36
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नारेगाव कचरा डेपोच्या विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली आहे. तेरा दिवसापासून कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. कचरा कोंडी सुटली जात नसल्यामुळे मनपा प्रशासन हैराण झाले आहे.

नारेगाव येथील कचरा डेपोवर एकही वाहन येऊ दिले जात नसल्यामुळे शहरातून दररोज निघणारा ४०० मेट्रीक टन कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न मनपासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे गेल्या १३ दिवसापासून कचरा गोळा करून वॉर्डावॉर्डातील मोकळ्या जागेवर साचविला जात आहे. परंतु कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे ढीग झाले असून त्यातून दुर्गंधी सुटली आहे. तोडगा निघाला नसल्याने १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नारेगावमधील (मांडकी) बंदी, शहराच्या चारही बाजूंनी कचरा डेपोला होणारा विरोध, यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन आता हतबल झाले आहे. शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे चित्र दिवसेंदिवस भेसूर होत आहे.

नारेगावचे आंदोलक आक्रमक

नारेगाव येथील नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधात गतवर्षी दिवाळीच्या सणातच चार दिवस कचऱ्याची कोंडी केली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महानगरपालिकेच्या मदतीला धावून आले. त्यांनी मध्यस्थी केल्याने नागरिकांनी चार महिन्याचा मनपाला वेळ दिला. मात्र थंड प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. मुदत संपल्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महानगरपालिकेला निवेदन देऊन आंदोलनाची आठवण देखील करून दिली. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. शेवटी १५ लाख नागरिक कचऱ्याच्या खाईत सापडल्यानंतर आता प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे.

वर्गीकरण करण्याचा ताळमेळ बसेना

वॉर्डा-वॉर्डात ‘माझी सिटी टकाटक’ या अभियानाअंतर्गत सीआरटी ग्रुपने कचऱ्याचे वर्गीकरण म्हणजेच ओला-सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. मात्र वॉर्डात वेगवेगळा जमा केलेला कचरा मनपाच्या वाहनांमध्ये एकत्र जमा केला जातो. एकत्र झालेल्या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे काही निवडक वॉर्ड वगळता प्रत्येक भागात परिस्थिती गंभीर असून, खुल्या जागांमध्ये नारेगावप्रमाणे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. मध्यवर्ती जकात नाका, गारखेडा, जवाहर कॉलनी, घाटी रुग्णालय, हर्सूल, रोशनगेट, कटकटगेट, सिल्लेखाना, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, पदमपुरा, कॅनॉट गार्डन तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला कचरा पडलेला दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या