
2010 मध्ये तत्कालीन रिलायन्स एनर्जीच्या वीज बिल दरवाढीविरोधात आंदोलन केलेल्या शिवसैनिकांची अंधेरीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मागील 13 वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. जोगेश्वरी पूर्व येथील तत्कालीन शिवसेना शाखाप्रमुख अनंत (बाळा) नर यांच्यासह अन्य शिवसैनिकांविरुद्ध दाखल केलेल्या गुह्यांमध्ये सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करू शकला नाही. त्यावर बोट ठेवत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जे. डब्ल्यू. गायकवाड यांनी सर्व आंदोलक शिवसैनिकांना निर्दोष ठरवले.
मुंबई उपनगराला वीज पुरवठा करणाऱया तत्कालीन रिलायन्स एनर्जीने ग्राहकांकडून वाढीव वीज बिले आकारली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अनंत (बाळा) नर यांच्यासह भरत पिसाळ, विनोद चौधरी, भूषण सकपाळ हे शिवसैनिक अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी येथील रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयात धडकले होते. त्या आंदोलनप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दगडफेक करीत वाहनाच्या व कार्यालयाच्या काचा पह्डणे, कर्मचाऱयांना जीवे मारण्याची धमकी देऊन काम बंद पाडणे अशा विविध आरोपांवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील 13 वर्षे अंधेरीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला चालला. या खटल्यात शिवसैनिकांच्या वतीने अॅड. सुहास घाग यांनी युक्तिवाद केला. आंदोलक शिवसैनिकांविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आले त्यासंबंधी सरकारी पक्षाकडे ठोस पुरावेच नाहीत. ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जे. डब्ल्यू. गायकवाड यांनी चारही आंदोलक शिवसैनिकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
हा निकाल जाहीर झाल्यानंतर बहुसंख्य शिवसैनिकांनी न्यायालयाच्या बाहेर मोठा जल्लोष साजरा केला. आम्ही सामान्य जनतेच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने आवाज उठवला होता. न्यायदेवतेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक बाळा नर यांनी दिली.