13 वर्षानंतर तरुणाच्या फुफ्फुसातून काढले पेनाचे टोपण

518

हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठी आरोग्य संस्था असलेल्या आयजीएमसीमधील डॉक्टरांनी ब्रांकोस्कोपीने एका 34 वर्षीय व्यक्तीला जीवनदान दिले आहे. संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसातून एक, दोन नाही तर चक्क 13 वर्षांपूर्वी अडकलेले पेनाचे टोपणं डॉक्टरांनी 20 मिनिटात बाहेर काढले. यामुळे डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विपिन असे या तरुणाचे नाव आहे.

विपिन यांनी 2006 साली चुकून पेनाचे टोपणं गिळले होते. त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. यामुळे उलट्यांमधून टोपण बाहेर पडले असावे असे त्यांना वाटले. पण त्यानंतर वरचेवर विपिनची तब्येत बिघडू लागली. मात्र नेमके कारण कळत नव्हते. यामुळे विपिनने अनेक डॉक्टरही बदलले. यादरम्यान त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्याही झाल्या. पण त्यातून विपिनला आजार झाल्याचे निदर्शनास आले नाही. यामुळे विपिन निश्चित होता. पण काही दिवसांपासून श्वास घेताना त्याला त्रास होऊ लागला. श्वास घेताना छातीतून शिटी सारखा आवाज ऐकू लागला. तसाच तापही येऊ लागला. यामुळे त्याला अस्थमा झाला असावा असे डॉक्टरांना वाटले व त्यांनी त्याला आयजीएमसीमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर तेथील डॉक्टरांनी विपनच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. त्याचबरोबर छातीचा एक्स रे आणि सीटी स्कॅनही केला. पण सर्व रिपोर्ट सामान्य आले. पण तरीही विपिनच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यामुळे छातीविकारतज्ज्ञ डॉक्टर आरएस नेगी यांनी विपिनची ब्रांकोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. त्यात विपिनच्या फुफ्फुसात पेनाचे टोपण अडकल्याचे दिसले. टोपण प्लास्टीकचे असल्याने ते एक्सरे व सीटीस्कॅनमध्ये दिसले नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनी ब्रांकोस्कोपीने 20 मिनिटात टोपण काढले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या