
हिंदुस्थानी रणरागिणींनी इंग्लंड महिला संघाविरुद्ध 23 वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पँटरबरी येथे खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय लढतीत महिला टीम इंडियाने यजमान इंग्लंड महिला संघाचा 88 धावांनी पराभव करीत 3 लढतींच्या मालिकेत 2-0 अशी अपराजित आघाडी घेतली. या विजयाच्या शिल्पकार ठरल्या 111 चेंडूंत 143 धावांची धडाकेबाज खेळी करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि 57 धावांत 4 फलंदाज बाद करणारी रेणुका सिंग.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने इंग्लंडच्या घरच्या मैदानावर 23 वर्षांनंतर ही वन डे मालिका जिंकली आहे. यापूर्वी 1999 मध्ये अंजुम चोप्राच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्लंडवर 2-1 असा मालिका विजय मिळवला होता.
रेणुकाच्या तुफानापुढे यजमान 245 धावांत गारद
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 44.2 षटकांत 245 धावांत गारद झाला. टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने तुफानी गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्या. तिने 10 षटकांत 57 धावा दिल्या. त्याचवेळी हेमलताला 2, तर दीप्ती सिंग आणि शेफाली वर्मा यांना 1-1 विकेट मिळाल्या. रेणुकाने दिलेल्या हादऱयांनंतर यजमान इंग्लंड महिला संघ सावरूच शकला नाही.
डावखुऱया स्मृती मंधानाने या सामन्यात वन डे क्रिकेटमधील तीन हजार धावा पूर्ण केल्या. महिला वन डे सामन्यात ही कामगिरी करणारी ती तिसरी हिंदुस्थानी खेळाडू ठरली. त्याच्या आधी हिंदुस्थानी माजी कर्णधार मिताली राज आणि सध्याची कर्णधार हरमनप्रीत काwर यांनी ही कामगिरी केली आहे. तिने सर्वात जलद तीन हजार धावा करण्याच्या बाबतीत माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले आहे.
कर्णधार हरमनचा शतकी धमाका, हरलीनचे अर्धशतक
प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी महिलांनी 50 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 333 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडविरुद्ध वन डेमध्ये टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. हरमनप्रीत काwरने झंझावाती खेळी करताना अवघ्या 111 चेंडूंत करत 143 धावा केल्या. यादरम्यान तिच्या बॅटमधून 18 चौकार आणि 4 षटकार आले. हे तिचे वन डे क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. इंग्लंडमध्ये वन डेमध्ये शतक झळकावणारी ती पहिली आशियाई कर्णधार ठरली. हरमनला उत्तम साथ देत हरलीन देओलनेही या सामन्यात 58 धावांची शानदार खेळी केली. तिने 72 चेंडूंचा सामना केला. टीम इंडियाने शेवटच्या 24 चेंडूंत 71 धावा जोडल्या. हरमनप्रीतने आपल्या डावातील शेवटच्या 11 चेंडूंमध्ये 43 धावा फटकावल्या.