तब्बल २९ वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग

41

सामना प्रतिनिधी । वडवणी

तब्बल २९ वर्षाने म्हणजे १९८९ साली दहावीची परिक्षा दिलेल्या माजी विद्याथ्र्यांचा वर्ग पुन्हा भरला, जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम रंगला, तेव्हा शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

वडवणीच्या जिल्हा परिषद शाळेच्या १९८९ साली दहावीची परिक्षा देणाऱ्या वर्ग मित्रानं पुढाकार घेवून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची निर्मिती केली. दोन-अडीच वर्षामध्ये दहावीनंतर विखुरलेल्या सर्व वर्ग मित्राशी संपर्क साधून एका भन्नाट कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या वर्गातील सर्व विद्यार्थी मित्रांना आणि विद्यार्थीनींना निमंत्रण देत रविवारचा दहावीचा वर्ग भरवला. तब्बल २९ वर्षानंतर संपर्क न झालेले ५५ विद्यार्थी या स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी दूरवरून दाखल झाले. विद्यार्थ्यांसह तेव्हाच्या शिक्षकांना ही आमंत्रित करण्यात आले. संसारात रमलेले हे आजी- आजोबा एक दिवसासाठी पुन्हा विद्यार्थी झाले.

मला पुन्हा शाळेत जायचं असे म्हणत जमलेल्या या विद्यार्थ्यांनी रविवारची सुट्टी सार्थकी लावली. राष्ट्रगीताने वर्गाची सुरूवात झाली. चेहऱ्याची ओळख पुसट झालेल्यांनी आपला परिचय करून देत कायम स्मरणात राहिलेल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. वयाचे भान विसरून तासिका झाली, शेवटच्या तासात अनोखा खेळ ही घेतला. या भेटी गाठीने वयाची पंचेचाळीशी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी खड्या आवाजात मार्गदर्शन करत आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. माणुसकी हरवलेले आजचे विद्यार्थी भौतिक सुविधा मिळवू शकतात मात्र सामाजिक मनाचा विसर होत चालला आहे. जुन्या शिक्षकाप्रमाणे आजच्या शिक्षकांमध्ये तळमळ राहिली नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये नम्रतेचा अभाव आहे. तो धाक ती शिस्त लोप पावल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. आपले कुटूंब आपले विश्व झाले आहे, तुम्ही तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक रहा, नोकरदार असाल तर जबाबाबदारी ओळखा, आई -वडिलांना अंतर देऊ नका अशा मुद्द्यावर मार्गदर्शन करून पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने भरलेल्या डोळ्यांनी आठवणी साठवत निरोप घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या