ऑपरेशनच्या ५ वर्षानंतर पोटातून निघाली कात्री, महिलेचा मृत्यू

63

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातमधील अहमदाबाद येथे ऑपरेशनला ५ वर्ष झाल्यानंतर एका महिलेच्या पोटातून कात्री निघाली असून या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जीवीबेन (५०) असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली असून तिचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे.

कच्छमध्ये राहणाऱ्या जीवीबेन यांना पोटदुखीचा त्रास होता. यामुळे २०१२ मध्ये येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर पोटदुखी कायमची संपेल असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. पण शस्त्रक्रियेनंतरही पोटदुखीचा त्रास होत असल्याने हैराण झालेल्या जीवीबेन यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. यावर त्यांची कुठलीही तपासणी न करता हळूहळू आराम मिळेल असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले व पेनकिलर देऊन घरी पाठवले. पण तरीही जीवीबेन यांची पोटदुखी काही थांबली नाही. यास पाच वर्ष उलटून गेली तरी जीवीबेनची पोटदुखी कमी होत नसल्याने त्यांच्या घरातल्यांनी त्यांना गांधीधाम येथील रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी जीवीबेन यांच्या आवश्यक त्या तपासण्या करुन त्यांच्या पोटाचा एक्स-रे काढला. एक्स-रे बघून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण एक्स-रेमध्ये जीवीबेनच्या पोटात शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी चार इंचाची कात्री सापडली. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली व गंजलेली कात्री बाहेर काढण्यात आली. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना काही महिने रुग्णालयात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत गेली व रविवारी जीवीबेन यांचा मृत्यू झाला.

दरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच जीवीबेनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातलगांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या