बांग्लादेशपाठोपाठ श्रीलंकाही हिंदुस्थानच्या समर्थनासाठी सरसावला

कॅनडाने केलेल्या आरोपांमुळे हिंदुस्थान संतापला असून, त्यांच्या आरोपांना हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर विविध देश हिंदुस्थानच्या पाठिशी उभे राहायला लागले आहेत. बांग्लादेशपाठोपाठ श्रीलंकाही हिंदुस्थानच्या पाठिशी उभा राहिला आहे. श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनी म्हटलंय की कॅनडाने केलेल्या आरोपांवर हिंदुस्थाने संयमी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणी श्रीलंका देश हिंदुस्थानचे समर्थन करत आहे.

श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी म्हटले की श्रीलंकेच्या नागरिकांना दहशतवादामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. श्रीलंका दहशतवादाविरोधात लढण्यासाठी कटीबद्ध आहे. कॅनडासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोरागोडा यांनी म्हटले की हिंदुस्थानने या प्रकरणी घेतलेली भूमिका ही स्पष्ट आणि कणखर आहे. आमच्याबाबत विचाराल तर आम्ही हिंदुस्थानचे समर्थन करतो आहे. श्रीलंकेने पाठिंबा देण्यापूर्वी बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनीही हिंदुस्थानला पाठिंबा दिला होता. कॅनडामध्ये दहशतवाद्यांना आश्रय मिळाला असून तिथले पंतप्रधान जस्टीन ट्रूडो हे कोणत्याही पुराव्याशिवाय हिंदुस्थानवर अपमानजनक आरोप करत आहे. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याचं साबरी यांनी म्हटले आहे. ट्रूडो यांची ही सवय असल्याचं ते म्हणाले आहे.

कॅनडाला आठवला हिंदुस्थान

खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि हिंदुस्थान यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला असतानाच, हिंदुस्थानशी आमचे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असून इंडो-पॅसिफिक धोरणासारख्या संयुक्त बाबींसंदर्भात कॅनडाची कटिबद्धता कायम असल्याचे कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेअर यांनी म्हटले आहे. अर्थात निज्जर हत्येचा न्याय्य मार्गाने तपास सुरू राहील, अशी पुस्ती ब्लेअर यांनी जोडली असली तरी कॅनडाने या हत्येचा हिंदुस्थानशी संबंध जोडणारे कुठलेही ठोस पुरावे आतापर्यंत दिलेले नाहीत.

कॅनडासाठी सोडले हिंदुस्थानी नागरिकत्व

परराष्ट्र कामकाज खात्याने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2018 ते जून 2023 या कालावधीत सुमारे 1.6 लाख हिंदुस्थानींनी आपले नागरिकत्व सोडून कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारले आहे. अमेरिकेनंतर नागरिकत्वासाठी हिंदुस्थानींची कॅनडाला सर्वाधिक पसंती आहे.

कॅनेडियन नागरिकांना पुन्हा सावधगिरीचे आवाहन

सध्याच्या घडामोडींमुळे समाज माध्यमांवर कॅनडाविरुद्ध नकारात्मक भावना आणि निदर्शनांची आवाहने होत असताना हिंदुस्थानातील कॅनेडियन नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, अशा नव्या सूचना कॅनडाने जारी केल्या आहेत.