दरोडा टाकल्यावर चोराने पकडले पाय; म्हणाला ‘मला माफ करा, बहिणीचे लग्न करायचे आहे’

एका तरुणाने व्यावसायिकाची पत्नी आणि मोलकरीण यांना खेळण्यातील बंदूकीचा धाक दाखवत घरात चार लाखांची चोरी केली आहे. घरात दरोडा टाकल्यानंतर त्या तरुणाने व्यावसायिकाच्या पत्नीचे पाय पकडले आणि म्हणाला, मला माफ करा, बहिणीचे लग्न करायचे आहे, तुम्ही मला आईसारख्या आहात, असे म्हणत त्याने पोबारा केला. ही घटना ग्वाल्हेरच्या समाधिया कॉलनीत घडली आहे.

समाधिया कॉलनीतील कृष्णा एनक्लेव्हमध्ये दिलीप कुकरेजा हे व्यावसायिक राहतात. त्यांचे महाराज वाडा भागात दुकान आहे. सकाळी ते मुलगा उमेश याला सोबत घेऊन दुकानात गेले. त्यावेळी त्यांची पत्नी वंदना आणि मोलकरीण सुनीता घरी होते. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एक तरुण डिलीव्हरी बॉय म्हणून घरात घुसला. त्याने घरात घुसताच वंदना यांना पिस्तूलचा धाक दाखवला.

पिस्तूल रोखल्यानंतर वंदना आणि तरुणाची झटापटी झाली. त्यात तरुणाची पिस्तूल खाली पडली आणि तुटली. ती खेळण्यातील पिस्तूल असल्याचे त्या दोघींना समजले. त्या प्रतिकार करणार इतक्यात तरुणाने चाकू काढत त्यांच्या गळ्याला लावला. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडावर टेप चिटकवली. त्यानंतर त्याने घरात चोरी केली. त्याने चार लाखांचा ऐवज लांबवला आहे.

घरात दरोडा टाकल्यानंतर त्याने वंदना यांचे पाय पकडले आणि म्हणाला, मला माफ करा, मला बहिणीचे लग्न करायचे आहे, तुम्ही मला आईसारख्या आहात. नाईलाजाने मला हे करावे लागत आहे. असे म्हणत त्याने पोबरा केला. त्यानंतर वंदना यांनी कशीबशी सुटका करून घेत त्यांनी दिलीप आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांची घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. तसेच चोरट्याने लुटीनंतप वंदना यांचे पाय पकडून माफी मागितल्याचेही आश्चर्य व्य़क्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या