
पंजाबी रॅपर शुभनीत सिंह सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने शुभनीतवर चहूबाजूंनी टीका झाली. एवढेच नाही तर त्याची ‘स्टिल रोलीन’ इंडिया टूर रद्द करण्यात आली. मात्र आता कॉन्सर्ट रद्द झाल्यावर त्याचे डोके ठिकाणावर आले आणि त्याचे सूर बदललेले दिसत आहेत. त्याने इंस्टाग्रावर पोस्ट शेअर करत ”हिंदुस्तान माझाही देश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कॉन्सर्टसाठी तयारी करत होतो. कॉन्सर्ट रद्द झाल्याने फार दु:खी असल्य़ाचे सांगत त्याने पोस्ट शेअर केली आहे.
शुभनीत सिंह याने आपला हिंदुस्थानातील कॉन्सर्ट रद्द केल्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तो म्हणाला या कॉन्सर्टसाठी गेल्या अनेक दिवसांपासून तो तयारी करत होता. आपल्या देशात परफॉर्म करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. शुभने आपल्या इंस्टा पोस्टमध्ये लिहीले आहे की, पंजाबहून आलेल्या एका युवा रॅपर-गायक स्वरुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संगीत घेऊन जाण्याचे स्वप्न होते. मात्र नुकत्याच झालेल्या घटनेमुळे माझी सर्व मेहनत आणि मला पुढे जाण्यासाठी रोखण्यात आले आहे. मी यामुळे फार निराश आणि दु:खी झालो आहे.
शुभ याने पुढे लिहीले आहे की, हा देश माझाही आहे. मी माझ्या देशात, आपल्या लोकांसमोर परफॉ़र्म करण्यासाठी उत्सुक होतो. यासाठी मी अनेक दिवस मेहनत करत होतो आणि पूर्ण निष्ठेने गेले 2 महिने सराव करत आहे. मात्र आता वाटतंय नियतीला काही वेगळे मान्य आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी पंजाबच्या बलिदानाची आठवण करून देत शुभजीत म्हणाला, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या पूर्वजांनी डोळे मिचकावले नाहीत. पंजाब माझा आत्मा माझे रक्त आहे आणि आज मी जो कोणी आहे तो पंजाबीमुळेच.
आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टबद्दल बोलताना शुभने सांगितले की, उद्देश हाच होता की, राज्यात वीज खंडित आणि इंटरनेट सेवा बंदच्या बातम्या येत होत्या. त्यासाठी मी पंजाबसाठी प्रार्थना केली होती. कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असेही शुभने सांगितले.