लोकसभेत दणकून आपटल्यावर भाजपच्या चिंतनात चिंता; फडणवीसांची नित्या राणेला समज; मिंधे आणि अजित पवारांनाही सूचना

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणकून आपटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचे आत्मचिंतन करताना एकमेकांची उणीधुणी काढू नका, पराभवाचे खापर एकमेकांवर फोडू नका. महायुतीत समन्वयाचा अभाव आढळला आहे, पण त्याची जाहीर चर्चा नको. पक्षातल्या बातम्या पेरू नका, अशा शब्दांत दम भरला आणि पक्षाच्या बेताल प्रवक्त्यांच्या जिभेला गाठ मारली. पराभवाचे आत्मविश्लेषण करीत बसू नका, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.

भाजपच्या विधिमंडळ गटाची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या चिंतन बैठकीत भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांना आणि पक्षातील नेत्यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांची कबुली

लोकसभा निवडणुकीत आपल्याला काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला. तो टिपलेला आहे, पण तो जाहीर करण्याची आवश्यकता नाही. समन्वयाचा अभाव दिसला तो पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे. अमूक आमदाराच्या मतदारसंघातील या आमदाराकडे आम्हाला समन्वयाचा अभाव दिसला त्याची माहिती  त्या पक्षाच्या नेत्यांना सांगणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

प्रवक्त्यांचे कान उपटले

बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांचे त्यांनी कान उपटले. आमदार नितेश राणे यांचे नाव घेऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवक्त्यांनी समजून उमजून बोलावे. आता जाहीरपणे उणीदुणी काढण्याची वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आपण हेच सांगितल्याचे ते म्हणाले.

पोलिटिकल अर्थमॅटिक

या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व मी करीत असल्याने अपयशाची जबाबदारी माझी आहे. पक्षाने काम केले, पण केवळ ‘पोलिटिकल अर्थमॅटिक’मध्ये आम्ही कमी पडलो, असे गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

बातम्या पेरण्याचे काम बंद करा

भाजपचेच प्रवक्ते बातम्या पेरण्याचे काम कसे करतात याचे उदाहरण त्यांनी ईशान्य मुंबईतील मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघातील बातम्यांवरून दिले. मिहीर कोटेचा कसे पडले, कोणी काम केले नाही अशी एक बातमी आली. दुसऱ्याच दिवशी  दुसऱ्यांनी काम कसे केले नाही अशी बातमी आली. अशा प्रकारे बातम्या पेरण्याचे काम बंद करा. अशा बातम्या जाहीरपणे आणण्याचे काम पक्षासाठी योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रवक्त्यांना दम भरला.

सगळय़ांच्याच तक्रारी

सगळय़ांच्या काही तक्रारी आहेत. नेत्यांनी या तक्रारी समजून घेतल्या पाहिजेत. आता आत्मविश्लेषण करू नका, असे मी भाजपतर्फे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले आहे.