मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पाचव्या सत्राच्या परीक्षा दिवाळी नंतर, युवासेनेच्या प्रयत्नांना यश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या पहिल्यांदाच होणाऱ्या तृतीय वर्ष पाचव्या सत्राच्या परीक्षा 13 ऑक्टोबर 2022 पासुन जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलाव्यात याकरीता डी. जी. रुपारेल- माटुंगा, महर्षी दयानंद- परळ, विकास कॉलेज- विक्रोळी, रिझवी कॉलेज- वांद्रे, नॅशनल कॉलेज- वांद्रे येथील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

आज हे विद्यार्थी परीक्षा भवन येथे संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ यांना जाब विचारण्यासाठी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि मिलिंद साटम यांच्यासोबत आले होते. यावेळी झालेल्या प्रदीर्घ चर्चेअंती संचालकांनी आश्वासन दिले की, 13 ऑक्टोबर 2022 रोजी होऊ घातलेली परीक्षा दिवाळी नंतर घेण्यात येतील. यामुळे विद्यापीठ संलग्नित जवळपास 850 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांनी युवासेनेचे आभार मानले.