आठ दिवसांनंतर मच्छीमारांच्या नातेवाईकांनी सोडला सुटकेचा निःश्वास, वादळात भरकटलेल्या 8 बोटी परतीच्या मार्गावर

अरबी समुद्रात उसळलेल्या मोंथा वादळात भरकटलेल्या आठ मच्छीमार बोटींशी संपर्क साधण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. या सर्वच बोटी आता परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. त्या गटागटाने नजीकच्या बंदरात पोहोचणार आहेत. गावदेवी मरीन आणि चंद्राई या दोन्ही बोटी शुक्रवारी रात्री करंजा बंदरात दाखल झाल्या. या दोन्ही बोटीवरील 32 मच्छीमार आणि खलाशांना सुखरूप पाहिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ते आठ दिवसांपासून समुद्रात अडकून पडले होते.

मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यातील भरकटलेल्या आठ मच्छीमार बोटी मोंथा वादळामुळे समुद्रात भरकटल्या होत्या. काही बोटींचा संपर्क होत नसल्याने मच्छीमार आणि खलाशांच्या नातेवाईकांचे टेन्शन वाढले होते. तटरक्षक दलाने या बोटींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तटरक्षक दलाला सर्वच बोटींशी संपर्क साधण्यात यश आले आहे. सर्वच बोटी आता परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. वादळामुळे कोणती दुर्घटना घडली नसून कोणत्याही बोटीचे नुकसान झालेले नाही, असे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी सांगितले.

सर्व खलाशी सुखरूप

श्री गावदेवी मरीन, चंद्राई या दोन मच्छीमार बोटी करंजा बंदरात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास दाखल झाल्या आहेत. या दोन्ही बोटींवरील ३२ खलाशी ही सुखरूप बंदरात पोहोचल्याने बोटमालकांसह खलाशांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अब्दुल्ला खान यांची श्री स्वामी समर्थ बोटही ससून डॉक-मुंबई बंदरात 14 खलाशांसह दाखल झाली आहे.