फेसबुकनंतर आता गुगलवर डाटा चोरीचा आरोप

केंब्रिज एनालिटीकाने फेसबुकचा वापर करून यूजर्सचा डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचा धुराळा खाली बसतो ना बसतो, तोच आता गूगलसारख्या दुसऱ्या दिग्गज टेक कंपनीवरती अँड्रॉइड यूजर्सच्या डाटा चोरीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. गूगल प्रत्येक महिन्याला यूजर्सचा जवळपास १ जीबी डाटा गोळा करते आणि जाहिरातदारांना पोचवते असा आणि याच माहितीचा वापर करून या जाहिरातदारांतर्फे विविध प्रकारच्या जाहिराती यूजर्सच्या फोनवरती दाखवण्यात येतात असा आरोप देखील केला गेला आहे.

ओरॅकलच्या आरोपानुसार फोनमध्ये सीमकार्ड नसताना आणि लोकेशनदेखील बंद असतानासुद्धा गूगल यूजर्सचे लोकेशन ट्रक करते. या शिवाय गूगल अंड्रॉइड फोनच्या आयपी ऍड्रेस, वाय-फाय कनेक्शन आणि मोबाइल टॉवरद्वारे देखील यूजर्सच्या हालचालींवरती लक्ष ठेवून असते. ओरॅकलने एका प्रेझेंटेशनद्वारे गूगलच्या या सगळ्या कारवाया समोर आणल्या आहेत. यामध्ये गूगल ऍंड्रॉइड डिव्हाईसच्या बॅरोमीटरच्या मदतीने, हवेच्या दाबाचा वापर करून यूजर्सची लोकेशन कशी ट्रेस करते हे दाखवण्यात आले आहे.