चिंताजनक! मानवाकडून प्राण्यांना संक्रमण, इटावामध्ये 2 सिंहीणी कोरोना पॉझिटिव्ह

मानवासह प्राण्यांमध्येही कोरोना पसरू लागला आहे. हैदराबादमधील नेहरू जूलॉजिकल पार्क (NZP)मधील आठ सिंहांनंतर आता इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कातील (Etawah Safari Park) दोन सिंहीणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. लायन सफारी पार्काच्या संचालकांनी याबाबत माहिती दिली आहे.

पार्कातील गौरी (वय – 3 वर्ष 8 महिने) आणि जेनिफर (वय – 9 वर्ष) या दोन सिंहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. तपासणीमध्ये दो्न्ही सिंहिणींच्या शरीराचे तापमान 104 ते 105 अंश सेल्सियस दिसून आले. यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे आणि शौचाचे नमुने अखिल भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था बरेली येथे पाठवण्यात आले. यानंतर दोघींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हापासून दोन्ही सिंहीणी आयसोलेशनमध्ये आहेत.

दरम्यान, इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी गौरी आणि जेनिफर या दोघींना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रेसनोट जारी करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

’30 एप्रिलपासूनच गौरी आणि जेनिफरची तब्येत खराब होती, त्या दोघींना ताप होता. त्यानंतर त्यांचे रक्त आणि शौचाचे नमुने तपासणीसाठी बरेली याठिकाणी पाठवण्यात आले होते. 6 मे रोजी त्या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला. दोघी सध्या पशु वैद्यकीय रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून तज्ज्ञांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे’, अशी माहिती लायन सफारी पार्काच्या संचालकांनी प्रेसनोटद्वारे दिली.

8 सिंह पॉझिटिव्ह

याआधी हैदराबादमधील नेहरू जूलॉजिकल पार्क (NZP)मधील 8 प्राण्यांना कोरोना झाला होता. यात 4 सिंह आणि 4 सिंहीणी यांचा समावेश होता. मानवाद्वारे प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण होते.

आपली प्रतिक्रिया द्या