उबरने आला, १७ विद्यार्थ्यांना ठार मारलं आणि मॅकडोनाल्डमध्ये जाऊन बर्गर खात बसला

गोळीबार करणारा निकोलस क्रूझ

सामना ऑनलाईन, फ्लोरीडा

अमेरिकेतील फ्लोरीडा भागातील स्टोनमॅन डग्लस शाळेमध्ये गोळीबार करत १७ विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या निकोलस क्रूझबद्दल काही नवी माहिती उजेडात आली आहे. या माहितीमुळे हा हल्ला पूर्वनियोजित कट होता आणि तो निकोलसने अत्यंत थंड डोक्याने पूर्ण केला. हा हल्ला अमेरिकेच्या इतिहासातील शाळेमध्ये झालेला सगळ्यात मोठ्या आणि भयानक हल्ल्यांपैकी एक मानला जातो.

निकोलसला त्याच्या विचित्र स्वभावामुळे, विध्वंसक आणि उपदव्यापी वृत्तीमुळे याच शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने गोळीबार करण्यासाठी आधीपासून तयार केली होती. गुरुवारी सकाळी त्याने शाळेत जाण्यासाठी ‘उबर’ ची कार बोलावली. या गाडीच्या ड्रायव्हरने सांगितलं की निकोलसकडे काळ्या रंगाची एक बॅग होती. तपासामध्ये पोलिसांना कळालं की याच बॅगेतून निकोलसने मोठ्या प्रमाणावर बंदुकीच्या गोळ्या आणल्या होत्या. शाळेत पोहोचल्यानंतर त्याने वेगवेगळ्या वर्गात जाऊन मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला, ज्यामध्ये १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

गोळीबार केल्यानंतर शाळेमध्ये फायर अलार्म वाजवून शाळा रिकामी करण्याचा संदेश देण्यात आला. यामुळे झालेल्या गोंधळात आणि विद्यार्थ्यांच्या घोळक्यामध्ये निकोलस घुसला आणि शाळेतून सटकला. सटकण्यापूर्वी त्याने बंदूक आणि उरलेल्या गोळ्या शाळेतच फेकून दिल्या. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने मॅकडोनाल्ड गाठलं आणि बर्गरची ऑर्डर दिली. बर्गर अर्धवट टाकून तो पायी घराकडे निघाला असताना पोलिसांनी त्याला पकडलं, यावेळी त्याने अजिबात प्रतिकार केला नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. निकोलसला एका दांपत्याने दत्तक घेतलं होतं. त्याला दत्तक घेणाऱ्या आईवडीलांचा मृत्यू झाल्याने तो दुसऱ्या कुटुंबासोबत रहात होता. या कौटुंबिक घटनांचा त्याच्या मानसिकतेवर काही परिणाम झालाय का हे देखील पोलीस तपासत आहेत.