ठाण्याच्या भंडारआळीतील एका चिमुकलीचा विनयभंग करणारा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव तीन दिवसांनंतरही मोकाटच आहे. पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल न करता पोलिसांनी राजकीय दबावाखाली थातूरमातूर कलमे दाखल केल्याचा आरोप होत असून याविरोधात आज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रणरागिणींनी ठाणे नगर पोलीस ठाण्यावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नराधमावर तत्काळ कारवाई करा अशी मागणीच यावेळी शिवसेनेने केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील भंडारआळी येथे राहणारा उपविभागप्रमुख सचिन यादव या नराधमाने 11 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला. मात्र पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल न करता थातूरमातूर कलमे लावल्याने या नराधमाला तत्काळ जामीन मिळाला आहे. दरम्यान, कठोर कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या रणरागिणींनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, समिधा मोहिते, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, मंजिरी ढमाले, संगीता साळवी, कांता पाटील, सुप्रिया गावकर, सुनंदा देशपांडे, नंदा कडकोळ, रजनी बंका, हेमांगी पांचाळ, सचिन चव्हाण, संजय भोई, राकेश जाधव, आनंद मानकामे, वरूण मानकामे, अजय पवार, बिपिन गेहलोत उपस्थित होते.
न्यायासाठी पीडितेच्या कुटुंबीयांची फरफट
भंडारआळी परिसरात पीडित मुलगी राहते. ती सातवीत शिकत असून मिंधेंचा नराधम पदाधिकारी सचिन यादव हादेखील त्याच परिसरात राहतो. दुपारी दीडच्या सुमारास सचिनने पीडित मुलीच्या इमारतीतच तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटक केली. मात्र थातूरमातूर गुन्हा दाखल केल्याने नराधमाची सुटका झाली. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करूनही पोलीस दाद द्यायला तयार नाहीत. त्यामुळे न्यायासाठी पीडितेच्या कुटुंबीयांची फरफट सुरू आहे.