मराठी कलावंतांना मिळणार ‘म्हाडा’चे हक्काचे घर, म्हाडाच्या अध्यक्षांचे शिवसेना चित्रपट सेनेला आश्वासन

428

सामना प्रतिनिधी । मुंबई

सिनेमा आणि टीव्ही क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडाच्या माध्यमातून कमी किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन शुक्रवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शिवसेना चित्रपट सेनेला दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. राज्यात विविध जिह्यांत राहणार्‍या कलाकारांना त्यांच्याच विभागात म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मुंबई एमएमआर विभागात काम करणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात येतील असे उदय सामंत यांनी सांगितले. या योजनेमुळे बॅकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया या बैठकीनंतर आदेश बांदेकर यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी यांच्यासह विविध कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.  

रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा

केईएम आणि टाटा कर्क रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलबाहेर फुटपाथवर आसरा घ्यावा लागतो. त्यांच्या निवार्‍यासाठी म्हाडा पुढाकार घेणार असून काही इमारतीही बांधल्या जातील. मात्र त्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टने हातभार लावावा अशी मागणीही उदय सामंत यांनी यावेळी केली. तसेच चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त तिवरे गावही सिद्धिविनायक ट्रस्टने विकत घ्यावे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या