मृत्यूनंतर त्यांनी दिला पाचजणांना पुनर्जन्म

64

 

सामना ऑनलाईन । ठाणे

ब्रेन डेड झालेल्या जव्हेरबेन गोसर (66) यांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्यानंतर या अवयवांमुळे पाचजणांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही जव्हेरबेन गोसर या अवयवरूपाने जिवंत राहिल्या आहेत.

ठाणे चरई येथील फेनिल सोसायटीत राहणाऱ्या जव्हेरबेन गोसर या सकाळी झोपेत असतानाच बेशुद्ध झाल्या त्यामुळे  मुलांनी त्यांना  तातडीने  ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. ब्रेन डेड झालेला रुग्ण हा कोमात जातो. परंतु मेंदू  मृत झाला असला तरी उर्वरित अवयव कार्यरत असतात. त्याच अवस्थेत हे अवयव काढले तर त्याचा इतर रुग्णांना उपयोग होतो. आईचा तांत्रिक मृत्यू झाला असला तरी तिचे अवयव दान केले तर मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनेकांचे हे अवयव मिळून प्राण वाचतील. या भावनेतून त्यांची मुले निलेश आणि दिनेश गोसर तसेच कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे डोळे, त्वचा, यकृत व अन्य अवयवांमुळे पाचजणांना जीवदान मिळाले आहे.

अवयव दानाची चळवळ मजबूत व्हावी

आज असंख्य रुग्ण अवयवांसाठी वेटिंगवर आहेत. त्यांना वेळीच अवयव न मिळाल्याने अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. माझी आई तर ‘ब्रेन डेड’ झाली, पण तिच्या अवयवांमुळे अनेकांना जीवदान मिळेल व त्यांचे संसार सावरले जातील या भावनेतूनच आमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला. माझ्या वडिलांचेही मृत्यूपश्चात नेत्र आणि त्वचा दान केली आहे. नातेवाईकांनी ब्रेन डेड झालेल्या रुग्णांच्या अवयव दानाचा निर्णय घ्यावा. अवयव दानाची ही चळवळ अधिक मजबूत व्हायला हवी, अशी भावना जव्हेरबेन यांचे पुत्र नीलेश व दिनेश गोसर यांनी व्यक्त केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या