‘उरी’ वर ‘कबीर सिंग’ भारी, बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई

124

सामना ऑनलाईन | मुंबई

तरूणाईला वेड लावणारा ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने यंदाचे कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेले सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा कमाईचा विक्रम ‘कबीर सिंग’ने मोडला आहे.

दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक असणारा हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासून या चित्रपटाने कमाईत कोटींच्या कोटी उड्डाणं घेतली. पहिल्या आठड्यातच 100 कोटींची गल्ला जमवणारा हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही हिट ठरला आहे. चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सर्वात जास्त कमाई करत हा चित्रपट या वर्षीचा सगळ्यात ‘ब्लॉकबस्टर’ सिनेमा ठरला आहे.

‘उरी’वर ‘कबीर सिंग’ भारी
विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने 245 कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने उरीला मात दिली असून आतापर्यंत 246 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा पार करेल. दरम्यान, ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीयो पोस्ट करीत प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

‘कबीर सिंग’ – 246 कोटी
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ – 245 कोटी
‘भारत’ – 211 कोटी
‘केसरी’ व ‘टोटल धमाल’ – 154 कोटी

आपली प्रतिक्रिया द्या