कोल्हारमधील महिलेवर आभाळच कोसळले; आईनंतर नवऱ्यानेही जग सोडले

2566

जन्मदात्री आईने आठ दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. आईचा दशक्रिया विधी होत नाही तोच आयुष्याचा आधार असलेला नवरानेही जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत कोल्हारमधील  छाया ताराचंद सुरसे  या महिलेवर आभाळच कोसळले आहे. नियतीचा या आघातांमुळे आता जगायचे कसे असा प्रश्न छाया यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

कोल्हार येथे राहणाऱ्या छाया यांचे माहेर राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांची आई सिंधुबाई बाबुराव जगताप यांचे  अचानक निधन झाल्याने छाया माहेरी गेली होती. शनिवारी तिच्या आईचा दशक्रिया विधी होणार होता. तोच छायावर नियतीने दुसरा मोठा आघात केला. आयुष्याचा आधार असलेला तिचा पती ताराचंद भागवत सुरसे (वय 52) याने कोल्हार येथील राहत्या घरात गुरुवारी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. नाभिक संघटनेचा तालुका अध्यक्ष असलेल्या ताराचंदचे केवळ नाभिक समाजच नाही तर गावातील प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध होते. सामाजिक कामात अग्रेसर असलेला हसतमुख असलेल्या ताराचंदने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ताराचंदच्या पाठीमागे आई, लहान मुले,मुलगी आहे. बापाच्या आशा यावेळी जाण्याने ही मुलंही पोरकी झाली आहेत. ताराचंद यांचे कोल्हार येथे बाजारपेठेत सलूनचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी पत्नी आईच्या मृत्यूमुळे माहेरी गेली होता. तर मुले व इतर सर्व बाहेर गेले होते. घरात आई व ताराचंद यांचे शिवाय कुणीही नव्हते. दुपारी झोपण्यासाठी गेलेले ताराचंद यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने घरातील व्यक्तीने शेजाऱ्यांना आवाज दिला. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता ताराचंद यांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

 कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने छायाने जमेल ती कामे करून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. आजही अनेकांना जेवणाचे डब्बे बनवून देण्याचे काम छाया करतात. ताराचंदची शेखर व शुभम ही मुलेही शिक्षणासोबत वडिलांना सलूनच्या दुकानात कामत मदत करीत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकाचवेळी झालेल्या दोन आघातांमुळे छाया यांच्यावर आभाळ कोसळले असून आता मुलांना कसे सांभाळायचे आणि पुढील आयुष्य कसे काढायचे असा प्रश्न छाया यांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या